'ड्रीमरनर' - ऑस्कर पिस्टोरिअस, अनु. सोनाली नवांगुळ

Submitted by चिनूक्स on 3 August, 2012 - 13:33

उद्या, म्हणजे शनिवारी दुपारी, ऑस्कर पिस्टोरिअस लंडनला सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत आपली पहिली शर्यत धावेल. यापूर्वी त्यानं अनेक स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. पण उद्याची शर्यत मात्र खास असेल. ही शर्यत तो जिंको न जिंको, पण मैदानात उतरताक्षणी त्यानं इतिहास घडवलेला असेल. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कृत्रिम पायांनिशी धावणारा तो पहिला स्पर्धक असेल. जेमतेम पंचविशीचा ऑस्कर ’ब्लेडरनर’ या नावानं ओळखला जातो. ’पाय नसलेला जगातला सर्वांत वेगवान मनुष्य’ असंही त्याला म्हटलं जातं, कारण कार्बन फायबरांपासून तयार केलेले कृत्रिम पाय लावून तो धावतो.

'ड्रीमरनर' ही या विलक्षण खेळाडूची जीवनकहाणी. स्वच्छ, निकोप जीवनदृष्टी असेल, तर आयुष्य कसं मौजेचं बनतं, हे शिकवणारं हे आत्मचरित्र. इतर असंख्य आत्मचरित्रांपेक्षा खूप वेगळं. ऑस्कर आपल्या खोड्यांबद्दल लिहितो, आईवडिलांशी, भावाबहिणीशी असलेल्या नात्याबद्दल लिहितो, खेळांबद्दल आणि खेळाडूंबद्दल लिहितो, मैत्रिणींबद्दल लिहितो, व्हॅलेंटाइन डेला प्रेयसीच्या घरासमोर लावलेल्या दोनशे फुग्यांबद्दल लिहितो, चोरून सिगारेट ओढण्याबद्दल लिहितो, डर्टबायकिंगबद्दल लिहितो, सुदृढांशी करायच्या स्पर्धेबद्दल लिहितो, आणि अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करायला हवं, याबद्दलही लिहितो. या आत्मचरित्रात आत्मवंचना नाही. जगानं आपल्यावर कसा अन्याय केला, मी अपंग असूनही मला कशी सहानुभूती दाखवली नाही, याचं रडगाणं नाही. मी अपंग आहे, म्हणून मला अनेक सवलती मिळायलाच हव्यात, हे सांगणं नाही. मी अपंग असूनही केवढं यश मिळवलं, ही शेखी मिरवणं नाही. हे आत्मचरित्र आपल्याला मिळालेलं एवढंसं, काही वर्षांचं आयुष्य रसरशीतपणे कसं जगायचं हे शिकवतं. पण महत्त्वाचं म्हणजे 'सामान्य' असणं म्हणजे नेमकं काय, याचा विचार हे आत्मचरित्र करायला लावतं. सारे अवयव असणं, आणि त्यांनी त्यांना नेमून दिलेलं काम करणं, हे सामान्य असण्याला पुरेसं असतं का? ऑस्करला पाय नाहीत. पण तो जगतो, आणि जगला, ते आयुष्य किती विलक्षण आहे.. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा त्यानं आनंद घेतला आहे. अगदी लहानपणापासून तो भरभरून जगत आला आहे. ही जीवनदृष्टी त्याला कुठून मिळाली? आपल्या आयुष्याकडे त्रयस्थासारखं बघत, स्वतःची कणभरसुद्धा कीव न करता, आणि जगाला कीव करण्याची एकदाही संधी न देता, आपला आत्मसन्मान, मनाचा उमदेपणा, खिलाडूवृत्ती जपत जगणं तो कुठे शिकला असेल? समतेसाठी लढण्याचं बळ त्याला कुठून मिळालं असेल? सतत आपली क्षमता सिद्ध करताना तो कधीच थकत नाही, हे कसं?

ऑस्कर अकरा महिन्यांचा होता तेव्हा त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापावे लागले. त्याच्या पायांत फिब्युला हे हाडच नव्हतं. सतराव्या महिन्यात त्याला कृत्रिम पाय बसवले गेले, आणि दोन वर्षांचा व्हायच्या आतच तो चालायला शिकला. हॉकी, रग्बी, टेनिस, वॉटर पोलो, क्रिकेट, फूटबॉल असे असंख्य खेळ खेळत तो लहानाचा मोठा झाला. त्यानं मित्रांच्या खोड्या काढल्या, आणि मित्रांनी त्याला त्रास देण्यासाठी त्याचे खोटे पाय लपवले, तर त्याचाही आनंद लुटला. सोळाव्या वर्षी रग्बी खेळत असताना त्याचा गुडघा दुखावला. ऑस्कर आता पुन्हा खेळाच्या मैदानात परतणार नाही, असा अनेकांनी अंदाज बांधला. पण ऑस्करनं या दुखण्यातून बरं होण्यासाठी पळायला सुरुवात केली, आणि मग हा त्याचा आवडता खेळ बनला. जेमतेम दोन वर्षांनी, वयाच्या अठराव्या वर्षी, त्यानं अथेन्स इथे भरलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. बीजिंगच्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याचं त्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं, पण तिथल्या पॅरालिंपिक स्पर्धेत त्यानं सुवर्णपदकाची कमाई केली.

यंदाच्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यानं अनेक अडचणींना तोंड दिलं आहे. त्याच्या कृत्रिम पायांमुळे तो सुदृढ स्पर्धकांपेक्षा वेगानं धावू शकतो, कृत्रिम पायांचा त्याला फायदाच होतो, असं इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अ‍ॅथलेटिक्स फेडरेशननं जाहीर केलं, आणि त्याला सामान्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची बंदी घातली. ही बंदी अन्याय्य आहे, आणि कृत्रिम पायांचा कुठलाही फायदा होत नाही, झाला तर तोटाच होतो, हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेतली, आणि कोर्टात आपलं म्हणणं सिद्ध केलं. ऑस्करवर लादलेली बंदी मागे घेतली गेली. या सार्‍या प्रकरणाचा कुठलाही कडवटपणा मनात न ठेवता ऑस्कर उद्या धावणार आहे.

खरा खेळाडू कसा असावा, किंबहुना, उत्तम माणूस कसा असावा, हे 'ड्रीमरनर' वाचून कळतं. मूळ इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद सोनाली नवांगुळ यांनी केला आहे. वयाच्या नवव्या वर्षी सोनालीच्या पाठीच्या कण्याला इजा झाली. तेव्हापासून तिला चालता येत नाही. सततच्या शस्त्रक्रिया आणि इस्पितळांच्या वार्‍या, यांमुळे ती शाळेत जाऊ शकली नाही. घरी राहूनच ती शिकली. पदवी मिळवली. स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून एकटी कोल्हापूरला आली. सध्या ती पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे. 'स्पर्शज्ञान' या ब्रेल-पाक्षिकात ती उपसंपादक म्हणून काम करते. 'लोकप्रभा'सारख्या मान्यवर नियतकालिकांसाठी ती नियमितपणे लिहिते. कोल्हापुरातल्या बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीची ती समन्वयक आहे. ऑस्करप्रमाणेच स्वतःचं आयुष्य सोनालीनं घडवलं आहे. तीही रडत बसली नाही. तक्रारी केल्या नाहीत. प्रचंड मानसिक त्रास झाला तरी लढा अर्धवट सोडला नाही. तीही समतेसाठी लढते आहे.

ऑस्करच्या आईनं त्याला एका पत्रात लिहिलं होतं, 'शर्यतीत सर्वांत शेवटी येणारा हा पराजित नसतो. जो धावण्याचा प्रयत्नही न करता, कडेला बसून फक्त खेळ पाहतो, तो खरा पराजित'. उद्याच्या आणि यापुढच्या कुठल्याही स्पर्धांचा निकाल काहीही असो, आपण विजेते आहोत, हे ऑस्करनं कधीच सिद्ध केलं आहे.

'ड्रीमरनर' या ऑस्कर पिस्टोरिअसच्या आत्मकथनाचा मराठीत अनुवाद करणार्‍या सोनाली नवांगुळ यांचं या पुस्तकाविषयीचं मनोगत, आणि मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाची काही पानं...

last copy dreamruner_Oscar Cover.jpg

कधी कधी एखाद्या गाण्याची ओळ आपल्या जगण्यात मिसळते आणि जगणं गाण्यात मिसळतं ... कसं काय घडतं असं?
‘‘कोई सच्चे ख्वाब दिखा कर
आँखो में समा जा जाता है
ये रिश्ता क्या कहलाता है ..’’
हे गाणं आणि साऊथ आफ्रिकेतला ऑस्कर पिस्टोरिअस यांनी एकाच वेळी माझ्या हातात हात गुंफले ... त्या क्षणानंतर रोजचा दिवस म्हणजे एक सहल झाली.

ऑस्कर म्हणतो की देवानं जर मला विचारलं, की तुला तुझे पाय परत हवेत का, तर उत्तर देताना मला जरा विचारच करावा लागेल, कारण माझ्या शरीराबद्दलच्या, परिस्थितीबद्दलच्या नकारात्मक दिसणार्‍या गोष्टींमुळं माझ्यातल्या शक्यतांना निखार आला. लोक मला विचारतात की ‘कृत्रिम पाय असण्याचा अनुभव कसा असतो?’ तेव्हा मी उत्तरादाखल त्यांना तोच प्रश्‍न विचारतो, ‘पाय असण्याचा अनुभव कसा असतो?’

गुडघ्याखालचे पाय नीट न वाढल्यामुळे वयाच्या अकराव्या महिन्यात ऑस्करचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापण्याचा, अ‍ॅम्प्यूटेट करण्याचा अत्यंत त्रासदायक निर्णय त्याच्या आईबाबांना घ्यावा लागला. ऑस्कर चालायला लागला तोच मुळात कृत्रिम पायांवर. पण या वस्तुस्थितीकडे निखळपणे पाहण्याचा त्याचा स्वभावविशेष मला अत्यंत लोभस वाटला. प्रेयसीनं टेबलाखालून तिच्या पायानं लाडात गुदगुल्या केल्या तर कळणार नाही, या कारणामुळं फक्त पाय नसल्याचं मला वाईट वाटेल, असं ऑस्कर खोडकरपणे, मिश्किलपणे म्हणतो. अशासारख्या ऑस्करच्या आणखी कितीतरी गोष्टी वाचल्या आणि मी ऑस्करच्या, त्याच्या आयुष्याच्या प्रेमात पडले. त्याच्या आयुष्यातल्या घटनांबद्दल भारुन जाणारे लाखो वाचक-दर्शक आहेत. मी भारुन गेले नाही, उलट तो काय सांगतो आहे, याबद्दल तटस्थपणे विचार करण्याची, वागण्याची माझी पातळी आहे, असं मला वाटलं... वयाच्या नकळत्या टप्प्यावर माझं स्वत:चं चालणं हरवल्यावर शरीराबद्दल, स्वत:च्या जगण्याबद्दल, वस्तुस्थिती स्वीकारून, त्यातून नवं काही उमलेल यावरच्या विश्‍वासाबद्दल येणारी ‘जाग’ आणि ‘असोशी’ यामुळं त्याचं आयुष्य मी जगत्ये, असं मला वाटत राहिलं.

... असं वाटायला लागलं की, हा कोण, कुठचा माणूस आणि माझं जगणं, परिस्थितीशी झुंजणं, विचार करणं, जगण्याची चव घेणं, हे इतकं एका पातळीवर कसं बरं एकत्र येतं? गाण्याशी नातं जुळणं समजू शकतो आपण, पण कधीही प्रत्यक्ष न भेटता, न बोलता एखाद्या विशिष्ट माणसाशी नातं कसं जुळतं? तो दक्षिण आफ्रिकेत वाढलेला, मी भारतात. म्हणजे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीत काहीही साम्य नाही. लग्न ठरवताना अमुकतमुक गुण जुळावे लागतात म्हणे, मग मैत्रीचं नातं जुळताना नेमके कोणते गुण प्रबळ ठरतात? - आणि विचार करताना इतकं काही सापडतं की, आपलं जगणं अधिक ठामपणे सांगण्यासाठी सापडलेल्या अशा ‘ऑस्कर’चं जगणं लिहिणं ही निकड बनून जाते.

तीळ शरीरावर असला काय नि नसला काय, त्यानं जगण्यात काहीच फरक पडत नाही. ‘फास्टेस्ट मॅन ऑन नो लेग्ज’ अशी ओळख मिळालेला ऑस्कर स्वत:च्या शारीरिक अक्षमतेला अंगावरच्या तिळाइतकी किंमत देतो. ‘धावणं’ हेच आपलं जगणं, असं ठरवल्यावर एकाग्रचित्तानं खडतर प्रशिक्षण, सराव, स्पर्धा यांमध्ये स्वत:ला झोकून देतो आणि झोकून दिल्यावर जेव्हा या मेहनतीला मेडलांच्या रूपानं, विश्‍वविक्रमांच्या रूपानं कौतुकाची पावती यायला लागते, तेव्हा अचानक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुदृढ खेळाडूंसोबत स्पर्धा करण्याबाबतीत त्याच्यावर निर्बंध लादले जातात. या निर्बंधांना खोडून काढण्यासाठी प्रसंगी अपमानास्पद वाटेल, आत्मसन्मानाला तडा जाईल असं वाटेल, इतपत कड्या परीक्षांना ऑस्कर सामोरा जातो. - मात्र ‘ड्रीमरनर’सारखं आत्मकथन लिहिताना ‘मी इतकी जिद्द दाखवतो तरी ‘समाज’ माझ्याशी कसा वागतो पहा', म्हणून तो रडारड करत नाही, मेलोड्रामा करत नाही. इतकंच काय ‘विकलांग माणसांसाठीचा दीपस्तंभ’ म्हणून प्रेरणेचा ठेकाही स्वत:कडे घेत नाही.

पुस्तकातल्या घटना, घटना ज्यांच्या आयुष्यात घडतात ती पात्रं, बाकी तपशील काही एका काळानंतर विसरले जाऊ शकतात कदाचित, पण माणसाच्या मनात चैतन्य जागं कसं राहतं, तो संकटाच्या क्षणी धैर्य कुठून मिळवतो, जीवनाचा रसरसून आनंद घेताना भविष्याची भीती किंवा दडपण तो कुठं दडवून ठेवतो, या दडपणाची, भीतीची सावली तो नाहीशी कशी करु शकतो, या प्रश्‍नांचा मागोवा तर रोजच्या आयुष्यात कळत नकळत आपण घेतंच असतो. जे पुस्तक वाचून संपल्यावर आपल्या मनात सुरु राहतं, ते काही विलक्षण असलं पाहिजे ... अशा ‘विलक्षणा’ला शोषल्याशिवाय कोणी कसं शांत जगू शकेल?

- सोनाली नवांगुळ

***

आम्ही दर आठवड्यातले दोन तीन दिवस तरी बाहेर फिरायला जायचो. ते दिवस धमाल म्हणजे धमाल... आणि डिसेंबरची तर मोठ्ठी सुट्टी ... त्या सुट्टीसाठीचं आमचं हक्काचं ठिकाण म्हणजे प्लेटनबर्गचा समुद्र किनारा. दक्षिण अफ्रिकेतला प्लेटनबर्ग बे हा पोर्तुगिजांचा शोध. जोहान्सबर्ग ते प्लेटनबर्ग हा मोठा प्रवास कारमधून करणं म्हणजे काहीतरी भव्यदिव्य करण्यासारखंच असतं. लांबलचक, कधी संपणारच नाही, असं वाटणार्‍या त्या प्रवासाच्या काही कडूगोड आठवणी माझ्या स्मृतिपटलाचा एक भाग आहेत. अर्थात या आठवणी आमच्या बाबांमुळं पक्क्या झाल्यात, हेही तितकंच खरं. जोहान्सबर्ग ते प्लेटनबर्ग हे १२०० किलोमीटरांचं अंतर सलग पार करायचं हा हट्टच असायचा त्यांचा. हे अंतर एकाच टप्प्यात पार करायचं, हा मुद्दा त्यांनी उगीचच अभिमानाचा आणि कौटुंबिक अस्मितेचा बनवून टाकला होता. अशा एका सलग प्रवासात माझी अवस्था खूपच बिकट झाली. मला गाडी लागली. रस्ताभर मळमळत राहिलं. बाबांनी हौसेनं आमच्या प्रत्येकासाठी दुपारच्या जेवणाकरता काही खास बनवलं होतं, पण बनाना मिल्क, फिश पेस्ट रोल्स असे खास आवडीचे पदार्थही माझी खाण्याविषयीची अनिच्छा कमी करू शकणार नाहीत, याची खात्री प्रत्येकालाच तोवर झाली होती. प्लेटनबर्ग बे यायला साधारण ३०० किलोमीटर राहिले असावेत. सलग प्रवासातला नीरसपणा शिगेला पोहोचला होता; अशावेळी बाबांना अचानक शॉर्टकट घेण्याचं सुचलं. दोन उंच दर्‍यांमधनं गेलेला कच्चा मातीचा रस्ता होता तो. खरं तर नेहमीच्या रस्त्यापेक्षा या शॉर्टकटमुळं प्रवासाचं मूळ अंतर ८० किलोमीटरांनी वाढलं ... पण वार्षिक सहलीतला एकसुरीपणा त्यामुळं कमी झाला हे महत्त्वाचं!

जसंजसं अंतर कमी व्हायचं तसं आम्हांला वाटायचं की, हो... आता समुद्र दिसणार! जो कुणी पहिल्यांदा समुद्र पाहील, त्याला राहिलेला चॉकलेटचा मोठा बार मिळेल. आमची धाकटी बहीण एमी नेहमीच चॉकलेट पटकावायची. खरं तर ती प्रत्येक वळणावर ‘समुद्र...समुद्र’ म्हणत किंचाळायची. मी व माझा भाऊ कार्ल याला विरोध करायचो, कारण समुद्र कुठूनही अजून दिसत नसायचा. पण आमचे बाबा! ते तिचं म्हणणं खरं असल्याचं वातावरण तयार करायचे आणि चॉकलेट तिला मिळून जायचं. एमीची नजर तेज असल्यामुळं तिला आधी समुद्र दिसायचा की ती नेहमी फारच आज्ञाधारक, गुणी मुलीसारखी वागते यामुळं तिला चॉकलेट मिळायचं? - यावर कितीतरी वाद घालता येऊ शकला असता. पण तो प्रश्‍नच नव्हता, कारण एमी म्हणजे आमच्या बाबांची ‘जान’ आहे, याची आम्हांला खात्री होती . आमचे बाबा, आई शॅला, भाऊ कार्ल, धाकटी एमी आणि मी असं आमचं पंचकोनी कुटुंब, एकमेकांशी घट्ट बांधलेलं.

कार्लनंतर जवळपास एक वर्ष आठ महिन्यांनंतरचा माझा जन्म. १९८६ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २२तारखेला माझा जन्म झाला आणि माझ्या आईबाबांची खरी परीक्षा सुरू झाली. जोहान्सबर्गच्या सँडस्टोन क्लिनिकमध्ये मी पाळण्यात शांत झोपलो होतो. ३ किलो ३०० ग्रॅम वजनाचं सुंदर, निरोगी बाळ ... बाबा माझ्याकडे मोठ्या प्रेमानं, निरखून पाहात होते... आणि त्यांच्या लक्षात आलं की गडबड आहे! काहीतरी गडबड आहे!! माझ्या दोन्ही पायांतलं फिब्यूला हे महत्त्वाचं हाड नव्हतं. आपल्या पूर्ण शरीराचं वजन तोलू शकणारा पायाच्या घोट्यापासून ते गुडघ्यापर्यंतचा हाडाच्या नळीचा भागच नव्हता माझ्या पायांना. पावलांची वाढही अपुरी होती. त्यांना पुढचा भागच नव्हता ... सोप्या भाषेत सांगायचं, तर तिथं फक्त दोन बोटं उगवली होती. बाकीची हाडं आणि टाचा होत्या. हे सगळं काय होऊन बसलंय याचा पत्ता हॉस्पिटलमधल्या कर्मचार्‍यांना नव्हता. माझ्या बाबांनीच पहिल्यांदा हे सगळं पाहिलं आणि मग आईबाबांनी हॉस्पिटलमधल्या लोकांना प्रश्‍न विचारायला सुरुवात केली.

त्या दोघांचा एक निश्‍चय पक्का होता - मला इतरांसारखं सामान्य जीवन कसं जगता येईल या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांची काहीही करायची तयारी होती.

नशिबानं माझ्या पायांच्या स्थितीबद्दल मला कधी कुणाला आपणहून काही विचारण्याची पाळीच आली नाही. अगदी सुरुवातीपासून सगळं सरळ आणि स्पष्ट होतं. माझा जन्म झाल्यापासून माझ्या आईबाबांनी माझ्याबद्दल सल्ला घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातल्या किती तज्ज्ञांचे उंबरे झिजवले याच्या सुरस कथा मी किती वेळा ऐकल्या याची गणतीच नाही. माझ्यासमोर किंवा माझ्या भावंडांसमोर, ओळखीच्या लोकांसमोर माझ्याबद्दलची चर्चा करण्यात त्यांना कधीच लाज वाटली नाही किंवा अमुकतमुकसमोर कसं बरं बोलायचं, असा त्यांचा गोंधळही उडाला नाही. आमचे कितीतरी मित्र आणि परिचित घरी यायचे, तेव्हा कधी सहजच किंवा कधी अगदी हटकून, माझ्या मेडीकल अपडेटांबद्दल ते विचारायचे - आणि आईबाबा मग त्यांच्या प्रश्‍नांची सविस्तर उत्तरं द्यायचे. अजिबात अस्वस्थ न होता! वेगवेगळ्या तज्ज्ञांनी त्यांना काय सल्ला दिला आणि मग सेकंड किंवा थर्ड ओपिनियन म्हणून ते कुणाकडं गेले वगैरे, सगळं इत्थंभूत. इतक्या सगळ्या नाणावलेल्या तज्ज्ञ लोकांना भेटूनभेटून आणि त्यांच्याशी चर्चा करून माझ्या आईबाबांचं ज्ञान मात्र भलतंच वाढलं होतं. या रस्त्याच्या प्रत्येक वळणाला हे ज्ञान वाढतंच जात होतं. त्यांना या प्रवासात कुणीच नाऊमेद करू शकत नव्हतं. मला या दोघांबद्दल, खरंच ते माझे आईबाबा आहेत या भावनेपेक्षाही जास्त, अधिक गहिरा असा आदर वाटतो, कारण हा मार्ग अजिबात सोपा नव्हता ... पण आमचं पिस्टोरिअस खानदान हे अत्यंत हट्टी, कठोर! सहज हार न जाणारं!
गुडघ्याखालच्या माझ्या पायांची झालेली अपुरी वाढ पाहता माझ्याबाबतीत काय करायचं, हा आईबाबांपुढचा मोठाच प्रश्‍न होता. एकतर माझी केस ही सर्वसाधारण केस नव्हती. ती गुंतागुंतीची तर होतीच, पण दुर्मिळही होती. मी कधी चालू शकणार नाही किंवा कदाचित कायमस्वरूपी व्हीलचेअरच्या मदतीनंच मला जगावं लागू शकेल, असा निष्कर्ष कोणीही सहज काढावा अशी स्थिती होती. माझ्या पालकांनी जरा निराळा विचार करायचं ठरवलं. मी जास्तीत जास्त सामान्य आयुष्य जगू शकेन अशा सगळ्या शक्यता धुंडाळायचा त्यांनी निर्णय घेतला. माझे पाय कापायचे, या निर्णयापर्यंत ते जेव्हा आले तत्पूर्वी ते वेगवेगळ्या देशांतील उत्कृष्ट अशा अकरा अ‍ॅम्प्यूटेशन तज्ज्ञांच्या संपर्कात होते. खंडीभर सल्ले त्यांच्याकडे जमा झाले होते.

प्रत्येक स्पेशालिस्टाला भेटून निघताना त्यांचा प्रश्‍न असायचा, "जर ऑस्करच्या जागी तुमचा मुलगा असता आणि तुम्ही स्वत: त्याचं ऑपरेशन करू शकत नाही, अशा स्थितीत तुम्ही तुमच्या मुलासाठी कोणत्या स्पेशालिस्टाला ऑपरेशनसाठी निवडलं असतं?" या प्रश्‍नामुळं माझ्या पालकांकडे निष्णात, विश्‍वासू अशा तज्ज्ञांची यादीच तयार झाली. यातनं आणखी एक साधलं - आपल्या मुलाच्या काळजीनं ग्रासलेल्या आईबापांना लुबाडणारे, फसवणारे काही ढोंगी डॉक्टरही याच यंत्रणेचा भाग असतात - त्यांच्यापासून स्वत:ला लांब कसं ठेवायचं, त्यांना प्रसंगी वठणीवर कसं आणायचं, याचेही मार्ग मिळत गेले.

प्रत्येक डॉक्टरकडे बाबा भेटायला गेले की त्यांनी सांगितलेलं सगळं काळजीपूर्वक ऐकायचे, टिपून घ्यायचे. माझ्या स्थितीबद्दलचा प्रत्येक रिसर्च पेपर त्यांनी काळजीपूर्वक वाचला होता. एखादी गोष्ट केली तर काय, नाही केली तर काय, यांबद्दलची त्यांची माहिती तज्ज्ञांशी बोलूनबोलून चांगलीच मजबूत झाली होती. यामुळं एखाद्या डॉक्टरनं भलतंच काही सुचवलं तर ते डॉक्टरचं बिल द्यायला सरळसरळ नकार द्यायचे. मी ज्याबद्दल सांगत होतो तो हा ‘पिस्टोरिअस अ‍ॅटिट्यूड!’ माझे गुडघे व्यवस्थित होते. यामुळं जर गुडघ्याखालून अ‍ॅम्प्यूटेट करण्याऐवजी गुडघ्यावरून पाय अ‍ॅम्प्यूटेट करूया, असं कुणी सुचवलं, तर ते खवळायचे. त्यांचं म्हणणं एकच होतं, की डॉक्टरांनी पेशंटला तपासून अतिशय गंभीरपणानं, पूर्ण विचारांती आपला सल्ला द्यायला हवा. हा जर त्यांचा व्यवसाय आहे तर तो त्यांनी जबाबदारीनं करायला हवा. एका सर्जनला तर बाबांचा चांगलाच अनुभव आला. त्यानं बिल दिल्यावर बाबांनी उपचाराबद्दलची स्वत:ची यादी काढून एकूण बिल स्वत:च्या पडताळणीनंतर त्याच्यासमोर ठेवलं... एवढं पाहिल्यावर त्या सर्जनची बोलतीच बंद झाली. बिचारा!

या सगळ्या काळात तज्ज्ञांनी माझ्याबद्दल जे जे काही सुचवलं, रिपोर्ट दिले, त्या सगळ्यांच कागदपत्रांचं एक आर्काइव्ह माझ्या आईबाबांनी तयार केलं होतं. मी पुढे कोण होणार, कसा होणार याबद्दलचं एक चित्र त्यांनी मनात रेखाटलं होतं. मी मोठा झाल्यावर मागच्या आयुष्याकडे वळून पाहाताना माझ्या आईबाबांनी हे काय करून ठेवलं, कशासाठी केलं, असं मला जर वाटलं, तर या सगळ्यांची तर्कशुद्ध उत्तरं त्यांना देता यावीत म्हणून त्यांनी हे दस्तऐवज नीट जपून ठेवले होते. माझ्या बाबतीत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी घेतलेल्या निर्णयांचं प्रतिबिंब मला पाहता यावं याची ती सोय होती. मी लहान होतो, स्वत:च्या बाबतीत निर्णय घ्यायची परिपक्वता माझ्यात नव्हती, म्हणून माझ्या वतीने त्यांनी माझ्या बाबतीतले वैद्यकीय निर्णय घेतले होते. या निर्णयांचं उत्तरदायित्व नीट निभावलं जावं, याची ते काळजी घेत होते. किती प्रकारच्या तज्ज्ञांनी माझ्याबाबतीत किती प्रकारची मतं दिली होती, उपचार सुचवले होते ... प्रत्येक सल्ल्यावर ते दोघंही पुन्हा पुन्हा विचार करत होते. शक्यता अजमावत होते. दुप्पट काळजी घेत होते. माझ्याबद्दल काही निर्णय घेणं त्यांना किती कठीण होतं आणि त्यांच्यावरचा ताण किती टोकाचा होता, याची मी तर फक्त कल्पनाच करू शकतो.

माझ्या डाव्या पायाची वाढ अपुरी असली, तरी उजव्या पायापेक्षा ठीक होती, म्हणून काही डॉक्टरांनी माझा फक्त उजवा पाय गुडघ्यापासून अलग करावा आणि डाव्या पायावर पुनर्निर्माण शस्त्रक्रिया करावी, असं सुचवलं होतं. जगभरच्या सगळ्या तज्ज्ञांच्या मतमतांतरांचा अभ्यास झाल्यावर आईबाबांनी त्यांच्या मते उत्कृष्ट असलेल्या तीन शल्यचिकित्सकांची निवड केली आणि त्यांच्याशी संपर्क साधायचं ठरवलं. माझ्या केसवर त्या शल्यचिकित्सकांनी विचार करावा, चर्चा करावी अशी विनंती करायचं त्यांनी निश्‍चित केलं. त्या तीन शल्यचिकित्सकांपैकी एक होते डॉ. गॅरी वर्सवेल्ड. डॉ. गॅरी हे दक्षिण आफ्रिकन. त्यांनी सगळी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून शस्त्रक्रिया करावी असं ठरलं.

आईबाबा डॉ. गॅरी यांना भेटले. डॉ. गॅरी यांनी जे काही सुचवलं ते जरा धाडसाचं होतं, पण हा धाडसी निर्णय माझ्या आईबाबांनी घ्यायला हवा, असं डॉ. गॅरींना वाटत होतं. डॉ. गॅरींचं म्हणणं होतं - माझे दोन्ही पाय गुडघ्याखालून काढून टाकावेत. माझं वय खूप लहान, म्हणजे काही महिन्यांचं असल्यानं चालण्याचं वय होईल तेव्हा प्रॉस्थेसिस, म्हणजे कृत्रिम पाय, घालून चालण्यात मला जरा कमी अडचणी येतील. मी चालायला शिकताना थेट कृत्रिम पाय घालूनच शिकलो, तर असं काही साधन वापरून चालण्याबद्दल ट्रॉमा किंवा वेगळेपणाबद्दलचा न्यूनगंड माझ्याबाबतीत तयारच होणार नाही. लहान बाळं जशी हळूहळू नैसर्गिक क्रमानं स्वत:च्या पायावर उभं राहातात अगदी तसंच मी कृत्रिम पाय घालून उभं राहीन, चालू शकेन!

डॉ. गॅरी यांच्या गाठीशी तत्पूर्वी केलेल्या अशा प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रियांचा मोठा अनुभव होता. आईबाबांना हा निर्णय घेताना सोपं वाटेल, आश्‍वस्त वाटेल अशी आणखी एक घटना घडली. माझ्या केसबद्दल ‘अमेरिकन इंटरनॅशनल अ‍ॅम्प्यूटेशन काँग्रेस’मध्ये डॉ. गॅरींनी चर्चा घडवून आणली. या परिषदेमध्ये जगभरातले तज्ज्ञ आले होते. तिथं मग माझ्याबाबतीत काय करावं, जास्तीत जास्त स्वावलंबी जगण्यासाठी माझ्यापुढे कोणकोणते पर्याय असू शकतील, यांवर बरीच चर्चा झडली, चिकित्सा झाली आणि अखेर दोन्ही पायांचं अ‍ॅम्प्यूटेशन करावं या डॉ. गॅरींच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.

दोन्ही पाय गुडघ्याखालून काढून टाकावेत यावर तज्ज्ञांचं एकमत झालं तरी आईबाबांना हे सगळं मनापासून पटावं आणि मग त्यांनी शस्त्रक्रियेला होकार द्यावा, असं डॉ. गॅरी यांना वाटत होतं. डॉ. गॅरी यांनी अशा प्रकारे शस्त्रक्रिया झालेल्या काही लहान मुलांशी आईबाबांची भेट घडवून आणली. प्रिटोरियामधल्या ‘प्रॉस्थेसिस सेंटर’ला भेट दिल्यावर आईबाबांच्या आश्‍चर्यात आणखी भर पडली. काही मिनिटांपूर्वी ज्या तरुणाला त्यांनी बागेत धावताना पाहिलं तोच तरुण त्यांची थोड्या वेळानं भेटण्यासाठी वाट पाहात होता. दोन्ही पाय अ‍ॅम्प्यूटेट केल्यावरही त्या तरुणामध्ये दिसणारी चपळाई आणि आत्मविश्‍वास बघून जणू त्यांना त्यांच्या सगळ्या शंकांची उत्तरंच मिळाली. त्या तरुणानंही त्यांना अतिशय शांतपणानं आपली गोष्ट सांगितली.

आणखी एका अकरा वर्षाच्या मुलाबाबतीतला अनुभवही माझ्याबद्दलचा निर्णय घेताना सोबतीला होता. तो मुलगा डॉ. गॅरींकडून उपचार घेत होता. लहानपणापासून त्याच्या पायांवर सतत पुनर्निर्माण शस्त्रक्रिया झाल्या होत्या. अतिशय कष्टानं तो चालायला शिकला. तेही फार सोपं नव्हतं. या सगळ्या दिव्यातून जाताना त्याच्या मनात एक विचित्र ओशाळेपण तयार होत होते. त्याची प्रत्येक कृती अवघडलेली वाटायची. त्याच्यात काही सुसूत्रता नसायची. यातनं त्याची शाळेतली पहिली दोन वर्षं अतिशय भयंकर गेली. मुलं त्याची सतत टिंगल करायची, खेळायला घ्यायची नाहीत. त्याच्या एका बाजूला कलून चालण्याच्या ढबीमुळं तो मतिमंदही असावा, असा बर्‍याचजणांनी समज करून घेतला होता. या सगळ्या काळात तो अत्यंत बुजरा तसंच एकलकोंडा होत गेला होता. आपल्या मुलाची ही स्थिती पाहून त्याचे पालक डॉ. गॅरी यांना भेटले. पुनर्निर्माण शस्त्रक्रिया करणं थांबवून त्या मुलाचे दोन्ही पाय अ‍ॅम्प्यूटेट करावेत, या निर्णयापर्यंत डॉ. गॅरी आले. शस्त्रक्रिया झाल्यावर त्या मुलाला सोयीचे कृत्रिम पाय देण्यात आले. चालणं सोपं झालंच, पण तो मैदानी खेळही खेळू लागला. त्याच्या पालकांनी त्याची पूर्वीची शाळा बदलून एक सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून त्याच्यासाठी नव्या शाळेत प्रवेश घेतला. आता तो एक खरा आनंदी मुलगा बनला होता. त्यानं आणि त्याच्या पालकांनी योग्य निर्णय घेतल्यामुळे खूप खूश होता.
तारुण्यात प्रवेश करण्याच्या दिशेनं चाललेल्या या मुलाला भेटल्यावर माझ्या आईबाबांमध्ये खूप फरक पडला. स्वावलंबी, आत्मविश्‍वासानं पुरेपूर भरलेला, निरोगी, खिलाडूवृत्तीचा तरुण होत असलेला तो मुलगा म्हणजे जणू त्यांनी माझ्याबद्दल केलेली कल्पनाच त्यांच्यासमोर थेट साकार झाल्यागत होती. त्याचं स्वातंत्र्य, त्याच्या नजरेच्या टप्प्यात असलेल्या अगणित संधी .. अगदी तोच अभिनिवेश माझ्यात असावा, असंच तर त्यांचं स्वप्न होतं.

- आणि मग त्यानंतर मोजक्या मीटिंग झाल्या आणि माझ्या दोन्ही पायांचं अ‍ॅम्प्यूटेशन करण्यात आलं. मी अकरा महिन्यांचा असताना डॉ गॅरी वर्सवेल्डनी माझ्या पायांवर ही महत्त्वाची शस्त्रक्रिया केली. डॉ. गॅरी म्हणजे खरोखरच एक अस्सल सुसंस्कृत माणूस! माझ्या पायावरच्या शस्त्रक्रियेपासून अगदी आजपर्यंत ते माझे आणि माझ्या कुटुंबाचे जिवलग मित्र आहेत. आमचं नातं वेगळंच आहे. त्यांनी माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. २००४च्या अथेन्स इथं झालेल्या पॅरालिंपिक्समध्ये मला पाठबळ द्यायला म्हणून ते थेट मैदानात पोहोचले तेव्हा माझा आनंद गगनाला भिडला होता.

माझ्या पायांची शस्त्रक्रिया करायची ठरली त्या दरम्यानची एक घटना बाबा रंगवून रंगवून सांगतात. मी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. बाबा धंद्यातल्या काही महत्त्वाच्या कामासाठी दौर्‍यावर होते. इकडं शस्त्रक्रिया सुरू होण्याची वेळ आली होती आणि तिकडं याबद्दलचा ताण असह्य होऊन मीटिंगच्या मध्येच ते ताडकन् उठून उभे राहिले. औचित्यभंग केल्याबद्दल आधी सगळ्यांची माफी मागितली आणि म्हणाले, "माझ्या मुलाच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया होते आहे, मला निघायला हवं!"

- मग तिकडून ते मिळेल त्या विमानानं जे निघाले ते थेट संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये पोचले. शस्त्रक्रिया होऊन काही तास उलटले होते. ते पोचले तेव्हा वेदनांनी कळवळून मी रडत होतो. मला असं बघून बाबांनी सिस्टरला विचारलं, "तुम्ही बाळाला योग्य वेदनाशामक दिलंय ना?"

सिस्टर त्यांच्या प्रश्‍नाचं उत्तर देताना गडबडली तेव्हा त्यांचा ‘पिस्टोरिअस अ‍ॅटिट्यूड’ जागा झाला. त्यांनी माझी मेडिकल फाईल कशीबशी मिळवली आणि त्यातल्या सूचना पाहिल्या. त्यांच्या लक्षात आलं की योग्य वेदनाशामक न मिळाल्यामुळं सिस्टरनं गडबडीत जो डोस दिला तो कितीतरी कमी क्षमतेच्या वेदनाशामकाचा होता. त्यांनी ताबडतोब डॉ. गॅरींना फोन केला. गॅरी बिचारे घरच्या कपड्यांत धावत तिथं पोचले आणि त्यामुळं होणारं वादळ टळलं. पण तुम्हांला सांगू का, त्या दिवसापासून मला मात्र खास दर्जा मिळाला ... एखाद्या राजपुत्रासारखा!

सहा महिन्यांनी, म्हणजे मी सतरा महिन्यांचा झाल्यावर मला माझे पहिले कृत्रिम पाय मिळाले... प्लास्टर व जाळीसारख्या कापडापासून बनलेले आणि अगदी त्वचेच्या रंगासारखे. खरं तर माझ्या मापाचा अंदाज येण्यासाठी ते बनवले होते, पण आश्‍चर्य असं की मला अगदी बरोबर बसले. मला हे पाय फार फार आवडले. त्या दिवसापासून मला जणू काही दुर्दम्य शक्तीच मिळाली. मी बेफाम झालो. कुठली ना कुठलीतरी अवघड ठिकाणं, जागा शोधायच्या आणि त्या सर करायच्या हा छंदच मला लागला. असं एकदा करून झालं की हे संपायचं नाही; मी पुन्हा चढणं-उतरणं चालूच ठेवायचो. माझ्या उत्साहाला सीमा उरली नव्हती. या पायांनी अमुकतमुक ठिकाणी जाणं मला झेपेल का, असले काही प्रश्‍नच मला पडायचे नाहीत. मनात आलं की पूर्ण केलं असं चाललं होतं.

याच काळात माझं व्यक्तिमत्त्व हळूहळू घडत होतं. प्रत्येक स्पर्धेला तयार राहायचा माझा आजचा जो स्वभाव आहे, तो त्या दिवसांत माझ्या कुटुंबाच्या मदतीनं आकाराला येत होता. माझा जन्म झाला तेव्हा कार्ल अठरा महिन्यांचा होता. तो मोठा. त्यामुळं हे तर स्पष्टच होतं की मी प्रत्येक बाबतीत त्याचं अनुकरण करायला पाहायचो, मग ते अनुकरण चांगल्या गोष्टींचं असो की बेछूट दंगामस्तीचं! तो जिथं जायचा, तिथं मी त्याच्या मागेमागे हजर असायचो. त्याच्याबरोबर नाही नाही ती असंख्य धाडसं करायचो ... मला जरा उत्तेजन द्यायचा अवकाश, मी बेबंद सुटायचो. आमचं नातं अगदी ‘टॉय स्टोरी’तल्या बझ आणि वूडीसारखं होतं.

- तर कार्ल जिथं जाईल तिथं मी त्याच्या पाठीमागं जायचो आणि आईबाबा याबद्दल मला कधीच टोकायचे नाहीत. लोकांच्या दृष्टीनं मी ‘अपंग’ होतो, त्यामुळं तर मला अधिकच चेव यायचा. मी सगळीकडे जायचो, होता होईल तितकं शरीराला दमवायचो. हे सगळं आज आठवतं तेव्हा जाणवतं की, खरंच आपल्या बाळाला जरा जादाच संरक्षण देण्याच्या सहजवृत्तीला आईबाबांना माझ्याबाबतीत किती मुरड घालावी लागली असेल? माझी वाढ निकोप व्हावी, मनात न्यूनगंड तयार होऊ नये म्हणून असं संयत वागणं, मला पूर्ण स्वातंत्र्य देणं त्यांना खरंच किती जड गेलं असेल?

मला स्वातंत्र्य देऊन आईबाबांनी माझ्यात स्वतंत्र बाणा रुजवला, कुठल्याही अडचणीतून मार्ग काढण्याची खुमखुमी दिली. परिस्थिती कितीही हिंमत खचवणारी असो, स्वत:ला जपत त्यातून पार होण्याचे संस्कार माझ्यावर केले.

कपाळावर रुळणारे सोनेरी केस, निळसर झाक असणारे डोळे - असा मी दिसायला एकदम गोंडस होतो. पण या गोडव्यात एक द्वाड मुलगा लपलाय अशी कल्पनाच कुणाला यायची नाही. आता मी दोन वर्षांचा झालो होतो. या काळात मला रबरी वेष्टनात दडलेले नवे लाकडी पाय मिळाले. त्यावेळी ‘नायके’नं लहान मुलांसाठीचे ‘नायके टोटल नाईन्टीज’ अजून बनवायला सुरुवात केली नव्हती, पण मिकी माऊसच्या चित्रामुळं प्रसिद्ध झालेले मी वापरत असलेले छोटे बूट मला फार आवडायचे. ते बूट खरंच एकदम ‘कूल’ होते. दक्षिण आफ्रिकेत त्या काळात लहान मुलांना चालायला शिकवताना जे बूट घालायला दिले जायचे त्यांना ‘टॅकीज’ म्हणत. या नावानं प्रसिद्ध असलेले पारंपरिक बूट वापरणार्‍या मुलांना मी माझ्या प्रॉस्थेसिसवर मिकी माऊस बूट घातल्यावर सहज मागे टाकायचो.

मी तीन वर्षांचा झालो तेव्हा माझ्या आणि इतरांच्या पायांतला नेमका फरक माझ्या लक्षात यायला लागला. माझे पाय खरंच वेगळे होते. हां... इतरांच्या पायांपेक्षा ते चांगले की वाईट, असा फरक शोधण्यात मला अजिबात स्वारस्य नव्हतं. फक्त एक नक्की की, माझे पाय वेगळे होते! रोज सकाळी उठल्यावर फेरफटका मारायला जातेवेळी कार्ल बूट घालायचा आणि मी माझे पाय चढवून त्यावर बूट घालायचो. एकसारखंच होतं हे आमचं. माझे बुटांचे दोन जोड असायचे. एक हा मिकी माऊसवाला, जो मी रोज घालायचो आणि दुसरा जरा खास, रविवारसाठी किंवा चर्चमध्ये जायचं असलं तर घालण्यासाठी राखून ठेवलेला. कधीकधी रविवारी कुठं पार्टी नसेल किंवा चर्चमध्येही नाही जाणं झालं, तर दोनदोन आठवडे माझ्या पायांमध्ये मिकी माऊस बूटच असायचा. तुम्हाला हे विचित्रपणाचं वाटेल, पण सगळ्यांत महत्त्वाचं सांगू? सलग शंभर दिवस तेच बूट घातले तरी हे बूट ना मला चावायचे, ना त्यातून नकोसा वास सुटायचा! इतरांच्या आणि माझ्या पायांतला हाच मला जाणवलेला महत्त्वाचा फरक किंवा फायदा होता.

१९८९च्या फेब्रुवारी महिन्यात आमची बहीण एमी जन्माला आली. आई सांगायची की, एमीच्या वेळेस ती गरोदर असताना मी व कार्ल तिला सतत चिकटून असायचो. तिच्या पोटावर टकटक करून मजा करायचो. मी आनंदाने म्हणायचो, "माझी बहीण!"
आणि कार्ल देखील ओरडायचा, "नाही. नाही. माझी बहीण!"

एमीचा जन्म झाल्यावर तिची इवलाली पावलं बघून मी तर हरखूनच गेलो. मी सतत तिच्या पावलांचे पापे घेई. तिच्या नावाचा उच्चार मला जमत नसे, मग मी तिला ‘गुगू’ म्हणून हाक मारायला लागलो. पाळण्यात ती शांत झोपलेली असायची आणि मी तिच्याशी खेळायच्या मूडमध्ये असायचो, तिला ‘‘गुगू ... गुऽऽऽऽगू’’ अशा हाका मारत. तिचं नाव घेऊन गुणगुणत मी तिची झोप मोडायचो आणि मग ती ठरल्याप्रमाणं भोकाड पसरायची. मी सतत तिला डिस्टर्ब करू नये म्हणून आईबाबांना सारख्या नव्या जागा शोधून तिला माझ्यापासून लपवायची वेळ येई. आणखी फार काही आठवत नाही त्या दिवसातलं, मीही फार लहानच होतो, पण एक आठवतंय ... आमचं कुटुंब मोठं गोड होतं ... एकमेकांशी मनानं बांधलेलं!

आम्ही हळूहळू वाढत होतो, तसे आमचे कुटुंबसदस्यही वाढले. आम्ही पाच जण आणि आमची कुत्री. प्रत्येकाचं एक कुत्रं, ज्याच्या त्याच्या आवडीचं. कार्लचा होता डॉबरमॅन, एमीचा बॅसेट हाऊंड. मी निवडली होती अमेरिकन पिट बुल जातीची कुत्री, तिचं नाव विवियन. विवियन दिसायला तशी इतर कुत्र्यांसारखीच होती, पण तिच्यात जराही आक्रमकपणा नव्हता. खरं सांगायचं तर कुत्रं म्हणून ती निरुपयोगी होती, मंद होती. ती दिवसदिवस झोपून असायची आणि सगळ्यात भयंकर म्हणजे ती मोठ्यानं घोरायची. एक दिवस माझ्या बाबांनी विवियनचं घोरणं रेकॉर्ड केलं आणि आईला ऐकवलं, जणू काही तिच्याच घोरण्याचा आवाज रेकॉर्ड केलाय अशा पद्धतीनं! आई बरोबर फसली. बिचारी भांबावली, आपण असं घोरतो हे ऐकून! ती तडक औषध आणायला धावली. या कटात आम्ही सगळेच सामील होतो, पण बहुतेक आमच्यापैकी कुणीच तिला खरं काय याचा पत्ता लागू दिला नाही. बाबांनाही हे कधीच कळलं नाही की आईनं त्यांच्याच खिशातले पैसे घेऊन एक महागडी अशी ऊशी विकत आणली. या उशीवर डोकं ठेवलं की माणूस घोरत नाही असं कळल्यामुळं आईनं ती आणली होती. पुढे कोण जाणे कसा, पण विवियनचा स्वभाव बदलत गेला. तिनं आमच्या बागेतल्या कासवावर हल्ला केला. आम्हां लहान मुलांनाही ती इजा पोहोचवू शकेल, अशी बाबांना काळजी वाटायला लागली. त्यांनी तिला डॉक्टरांच्या हवाली केलं. त्यानंतर आम्ही तिला कधीच पाहिली नाही.

बाबांच्या आग्रहामुळं एमीला जरा खास वागणूक मिळायची. बाबांचं म्हणणं असायचं की आम्ही एमीला ‘लेडी’ म्हणून विशेष वागणूक द्यावी... कारमधून एकत्र कुठे जाणार असू तेव्हा तिच्यासाठी गाडीचा दरवाजा अदबीनं उघडावा वगैरे. ती नेहमी कारमध्ये बाबांबरोबर पुढं बसायची आणि आम्ही मुलं मागं. जादा लाडानं जरा ती बिघडलेलीच होती. याबद्दल आम्ही बाबांकडे कुरकुर सुरू केली की ते विचारायचे, "तुम्ही तिला मी सांगितल्याप्रमाणं वागणूक दिली का?" हा प्रश्‍न त्यांनी विचारला की त्यावेळच्या आमच्या बुद्धीला झेपेल अशा, म्हणजे सातआठ वर्ष वयाच्या समजेनुसार विशिष्ट तर्‍हेच्या ‘जंटलमन’ पद्धतीच्या वागणुकीच्या मोहात आम्ही पडायचो. एमी लाडीकपणा करायची तसा आम्हीही खोडसाळपणा करायचो, नाही असं नाही. एकदा मी एमीला इतक्या जोरात ढकललं की तिच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. ती डोळ्यांत पाणी घेऊन बाबांकडं गेली. मी मात्र लगेच स्पष्टीकरण दिलं की, ‘काय करू, एमीच ‘लेडी’ सारखं वागत नाहीये.’

मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे समुद्रकिनार्‍यावरील आमच्या वार्षिक सहलीप्रमाणे दर आठवड्याच्या शेवटीही आम्ही दोनतीन दिवसांसाठी सहल काढायचो. कधीकधी तर अशा सहलीच्या वेळी दिवसाला वीसवीस किलोमीटर अंतर तुडवायचो. या सहलीत सगळ्यांसाठी नियम सारखे असायचे. आमच्या पाठीवर ठासून भरलेली रकसॅक असायची. या सॅकची जास्त जागा खाण्यापिण्याच्या सामानानं व्यापलेली असायची. आईबाबा आम्हांला आवडेल ते आणि वाट्टेल तितकं खाणंपिणं आमच्या सॅकमध्ये भरायला परवानगी द्यायचे. घेतलेलं सगळं इतकं जादा व्हायचं आणि पाठ ओझ्यानं दुखू लागायची, की मग आम्ही बसून त्यातलं काही फस्त करायचो आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू व्हायचा. या सगळ्या प्रवासात एमीला जरा जादाच महत्त्व आईबाबा द्यायचे. ती आम्हा दोघांबरोबर राहील, कंटाळणार नाही याची काळजी घ्यायला सांगायचे. मी कधीच त्यांच्या काळजीचा विषय नव्हतो. माझ्याबद्दलची त्यांची अडचण होती ती वेगळीच. मला पायी चालणं खूप आवडायचं. मी त्या सगळ्यांना मागं टाकून धावत पुढे जायचो, तिथं सॅक ठेवायचो आणि परत मागं पळतपळत त्यांना भेटायला म्हणून यायचो.

सुंदर, साध्या अशा आमच्या या एकत्र प्रवासाचे दिवस... कारमध्ये एकत्र घालवलेले ते सुंदर क्षण! बाबा कार-रेस लावायचे. मला फार आवडायचं ते. मोटरबाईक आणि कार यांच्याविषयीची एक धुंदी, एक पॅशन घेऊनच मी कदाचित जन्माला आलोय. मला वाटतं मी जेव्हा बोलायला लागलो तेव्हा माझा पहिला शब्द ‘कार’च असावा...
मी तीनएक वर्षांचा असताना आईकडे लालचुटुक रंगाची फोर्ड लेसर ही गाडी होती. ही कार ‘कूलेस्ट’ आहे असं मला वाटायचं. बाकीच्या सगळ्या गाड्या सटरफटर वाटायच्या. आईच्या मित्राला, गिलला अजूनही आठवतं की या कारविषयी बोलताना मी अभिमानानं सगळ्यांना सांगायचो, "फोर्ड लॅदर’ ... मस्त चालवते माझी आई!!"
माझ्या कारविषयीच्या प्रेमाला बाबांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. लेदरचं इंटिरिअर असलेली, दोन दरवाजे असलेली लाल मर्सिडीज स्पोर्ट्सकार होती बाबांकडं. ते कार चालवत असताना सन-रूफ उघडून त्यांच्या शेजारी बसणं मला किती आवडायचं! गाडी सिग्नलला थांबली की गडबडीनं मी सीटवर उडी मारायचो आणि कसंबसं उभं राहत डोकं सन-रूफमधून बाहेर काढायचो. त्यावेळी माझ्या मनात हॉलीवूडमधल्या सिनेमातला हिरो त्याच्या लिमोझीनमधून थाटात ‘असाच’ डोकावताना दिसायचा. हॉलिवूडच्या हिरोसारखं असं शाईनिंग मारणं म्हणजे माझा त्या आठवड्याचा ‘हायलाईट’. बाबा धंद्यानिमित्तानं सारखे टूरवर असायचे त्यामुळं त्यांच्याबरोबर असा वेळ घालवणं खास असायचं! एकदम खास!!

मी चार वर्षाचा झालो, तेव्हा बाबांनी माझ्यासाठी व कार्लसाठी निळ्या रंगाची ६० सी.सी.ची एक कार आणली. मग तर आमच्या वेगाला मर्यादा उरल्याच नाहीत. आम्हांला कुठलीही टेकडी सुसाट सुटायला चालायची, जितका जास्त खडा चढउतार, तितकी जास्त मजा! मला तर वाटतं, मी या कारच्या इतक्या प्रेमात पडलो होतो की, जर शक्य असतं तर मी रात्री झोपतानाही माझ्या बेडजवळ तिला उभी ठेवली असती. पुढची तीन वर्षं मी आणि कार्लनं या कारच्या आगेमागे करतच घालवली. तिच्या सहवासात आम्ही उपद्व्यापी, धाडसी बनलो होतो.
या सगळ्या मौजमजेला एकदम ब्रेक लागला तो आईबाबांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतल्याचं सांगितल्यावर.
मी तेव्हा सात वर्षांचा होतो. आईबाबांनी सांगितलं की ते घटस्फोट घेणार आहेत, त्यामुळं हे राहतं घर त्यांना विकावं लागेल. आम्ही आईबरोबर जवळच्या गावातल्या एका छोट्या घरात मुक्काम हलवला. आमच्या बेबंद धाडसांना जणू लगामच बसला. आईनं सांगितलं होतं, "महिन्यातून दोनदा आपली सहल नियमितपणानं होईल, तिथं आम्ही आमच्या गाड्या तुफान उडवू शकू, मजा करू शकू." तसं घडलंही, पण ते तसं, अगदी पूर्वीइतकं, मस्त नाही घडू शकलं... कधीच नाही!

प्लेटनबर्ग बेवरचा एक प्रवास मला आठवतोय - मी समुद्रकिनारी वाळूत पळत होतो. माझ्यापेक्षा थोडी मोठी दोन मुलं माझ्याजवळ आली. त्यांनी मला विचारलं, "तू पळतोस तेव्हा वाळूत पावलं उमटण्याऐवजी भोकं कशी बरं उमटताहेत?
मी लगेच उत्तर दिलं, अगदी सहजपणानं, "ती भोकं म्हणजेच माझी पावलं!"
"हो .. का?" असं म्हणून ती मुलं तिथून गेली, पण माझ्या पावलांसारखी पावलं उमटवण्याचा प्रयत्न करत, टाचेवर उड्या मारत गेली. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. ती मुलं काय म्हणताहेत आणि करताहेत या मागची भावना, विचार स्पष्ट कळावेत, उलगडावेत इतकी प्रगल्भता माझ्याकडे त्यावेळी नव्हती ... पण एक मात्र आता जास्त कळतंय आणि मला आश्‍वस्त करतंय की तुम्ही स्वत:ला कसे पाहता, किती मानता, तसंच लोक तुम्हांला पाहतात किंवा मानतात!

***

ड्रीमरनर
ले. - ऑस्कर पिस्टोरिअस
सहलेखक - गियान्नी मेरलो
अनुवाद - सोनाली नवांगुळ

मनोविकास प्रकाशन
किंमत - रुपये १७०
पृष्ठसंख्या - १७४

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! खुप छान ओळख ! वाचायलाच हवं. धन्यवाद चिनुक्स.

>>>'शर्यतीत सर्वांत शेवटी येणारा हा पराजित नसतो. जो धावण्याचा प्रयत्नही न करता, कडेला बसून फक्त खेळ पाहतो, तो खरा पराजित'.<<<
>>>मी अपंग असूनही केवढं यश मिळवलं, ही शेखी मिरवणं नाही...जे 'सामान्य' असणं म्हणजे नेमकं काय, याचा विचार हे आत्मचरित्र करायला लावतं. <<<
>>>मला स्वातंत्र्य देऊन आईबाबांनी माझ्यात स्वतंत्र बाणा रुजवला, ...ही प्रश्‍नच मला पडायचे नाहीत. मनात आलं की पूर्ण केलं असं चाललं होतं.<<<
>>>काढण्याची खुमखुमी दिली. परिस्थिती कितीही ... स्वत:ला जपत त्यातून पार होण्याचे संस्कार माझ्यावर केले.<<<
>>>मी कधीच त्यांच्या काळजीचा विषय नव्हतो...परत मागं पळतपळत त्यांना भेटायला म्हणून यायचो.<<<
>>>माझ्या पावलांसारखी पावलं उमटवण्याचा प्रयत्न करत,... तुम्ही स्वत:ला कसे पाहता, किती मानता, तसंच लोक तुम्हांला पाहतात किंवा मानतात!<<< सगळेच जबरदस्त!
सलाम ऑस्कर पिस्टोरिअस आणि सोनाली नवांगुळ _____/\_____

चिन्मय,
मूळ पुस्तकाचं नाव ड्रीम रनर आहे का ब्लेड रनर आहे? इंग्रजीमधे ब्लेड रनर म्हणून मिळतंय, तर अनुवादित पुस्तकं ड्रीम रनर म्हणून दिसत आहेत.

पुस्तक परिचय छान आहे. धन्यवाद Happy

छान वाटतेय ओळख

>>>लोक मला विचारतात की ‘कृत्रिम पाय असण्याचा अनुभव कसा असतो?’ तेव्हा मी उत्तरादाखल त्यांना तोच प्रश्‍न विचारतो, ‘पाय असण्याचा अनुभव कसा असतो?’>> हे भारी आहे.

मस्त.

फारच मस्त लिहिलंय..... जणू ऑस्करबरोबर वावरतोय असं वाटत होतं..
हे पुस्तक नक्कीच घेणार विकत...
सलाम ऑस्कर पिस्टोरिअस आणि सोनाली नवांगुळ __/\___ >>> +१००
धन्यवाद चिनूक्स.....

अंजली आणि राखी: ब्लेड रनर ह्या पुस्तकाची नवीनतम आवृत्ती ड्रीम रनर या नावाने बाजारात येत आहे आणि त्याचाच अनुवाद सोनालीने मराठी केला आहे. या नवीन आवृत्ती मध्ये काही शेवटची प्रकरणे जास्त आहेत जी तुम्हाला ब्लेड रनर या पुस्तकात सापडणार नाहीत.

व्वा ! अतिशय सुंदर विचार...
इथे परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
अमा +१

गेल्याच आठवड्यात तरूण भारताच्या पुरवणीत याविषयी वाचले
अगदी जिगरबाज - भन्नाट माणुस दिसतोय तो

@ निलीमा: कुणाला काय मानसिक विकार असतील सांगता येत नाही. आणि ज्यांना हिरो मानतो त्यांचे पाय मातीचे निघाले की मन विषण्ण होत. Somehow nothing surprises me about human beings anymore!

>> आणि ज्यांना हिरो मानतो त्यांचे पाय मातीचे निघाले की मन विषण्ण होत.

हा हा हा

<टवाळ मोड ऑन>
मातीचेच असणार .. त्या शिवाय का तुटले?
<टवाळ मोड ऑफ>

गोगोल टवाळ मोड मध्ये पण प्रतिसाद अनुचित होता. कल्पु .. हल्लीच आर्मस्ट्रॉन्ग नंतर आता हे...
पुर्वी आमच्या ओळखीचे एक जोडपे होते ते म्हणायचे ऑलिम्पिक वगैरे सर्व मुर्खपणा आहे त्यावेळी आम्ही त्यांचा कडाडुन विरोध करत असु पण आजकाल कधी कधी सेल्फ डाउट वाटतो या विचारांबद्दल.
(काहीजण म्हणतील की खुनाचा आणि स्पर्धेचा संबंध काय? पण स्पर्धकांना ज्या प्रकारे शारिरीक आणि मानसिक ट्रेन केले जाते त्यात काहितरी प्रचंड त्रुटी वा दुटप्पीपणा असावा असे वाटत रहाते).