'नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध' - मुक्ता मनोहर

Submitted by चिनूक्स on 14 December, 2011 - 13:04

बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार! बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.

बलात्काराचं वास्तव जसं वेदनादायी, तितकाच भीषण आहे बलात्काराचा इतिहास. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांचं मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं 'नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध' हे पुस्तक बलात्काराचा, त्यामागील पुरुषी वर्चस्वचादाचा नव्यानं विचार करतं. दोन महिन्यांपूर्वी शनिवारवाड्याच्या प्रांगणात या पुस्तकाचं प्रकाशन पंजाबातल्या श्री. बंतसिंग यांच्या हस्ते झालं. बंतसिंगांच्या मुलीवर बलात्कार केला गेला होता. आपल्या मुलीला न्याय मिळावा, तिच्यावर बलात्कार केलेल्यांना शिक्षा मिळावी, म्हणून बंतसिंगांनी जिवाचं रान केलं. या लढ्यात त्यांना आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमवावे लागले. तरी आजही त्यांचा लढा सुरूच आहे.

बलात्काररूपी वेताळाचा शोध, आणि त्या वेताळाशी संवाद साधत बलात्काराचा घेतलेला मागोवा, हे या पुस्तकाचं स्वरूप. बलात्कारी संस्कृती कशी आणि कधी निर्माण झाली याचा वेध घेत, स्त्रीपुरुष समानतेवर आधारलेला सर्जनशील समाज निर्माण करण्याचं एक आव्हान हे पुस्तक समोर ठेवतं.

या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मुक्ता मनोहर यांच्या मनोगताचा काही भाग, आणि पुस्तकातलं पहिलं प्रकरण..
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Nagnasatya.html

Nagnasatya.jpg

मनोगत

विक्रम-वेताळ या लोककथेचा जर मला आधार सापडला नसता, तर बलात्कार या प्रश्नाचे असंख्य जीवघेणे बारकावे आहेत, ते मला प्रवाहीपणे मांडताच आले नसते. मी सुरुवातीला बलात्कारी वेताळाला समोर ठेवून काही पानं लिहिली आणि हा आकृतिबंध योग्य आहे का, या विचारात पडले. मला एकीकडे चक्क भीतीच वाटत होती. पण तेव्हा मला माननीय रा.चिं. ढेरे यांच्या 'लोकसाहित्य - शोध आणि समीक्षा' या पुस्तकाचा मोठा आधार वाटला. त्यांच्या या पुस्तकात 'वेताळ पंचविशीचे स्वरूप' अशा मथळयाचा लेख आहे. वेताळ पंचविशीच्या कथा शतकानुशतके लोकमनात रुजलेल्या आहेत. मुख्य म्हणजे, या कथा वास्तव आणि अद्भुत, लौकिक आणि अलौकिक अशा दुहेरी पातळींवर आहेत. कदाचित यामुळेच बलात्कारासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या विषयासाठी त्यातील दाहक वास्तव काहीसे सौम्य करण्यासाठी या फॉर्मचा मला आधार घ्यावासा वाटला. या पद्धतीनं लिखाण करणं मला पदोपदी मोठं आव्हान आहे हे जाणवत होतं; पण एकदा तो फॉर्म निवडला म्हटल्यावर ते आव्हान स्वीकारण्याशिवाय मला दुसरा मार्गच नव्हता.

स्त्रियांवरील अत्याचाराचा 'बलात्कार' हा एकच पैलू मी उचलला होता, त्यामुळे कथांमध्ये तोचतोचपणा तर येणार नाही याची मला सतत धास्ती होती. त्यासाठीही काळाचे संदर्भ, बदलतं समाज जीवन व त्यातही ठाण मांडून बसलेला अत्याचाराचा भाग याची गुंफण करणं शक्य झालं. म्हणजे जेव्हा मी भंवरीदेवीची कथा सांगायला गेले, तेव्हा राजस्थानमध्ये भरणार्‍या गाढवाच्या जत्रेचा धागा मला घेता आला. भंवरीदेवी कुंभार समाजाची असणं आणि या समाजाचं पारंपरिक रूप लयाला जाणं, या सगळया बाबी एकत्रित घेणं केवळ वेताळामुळे शक्य झालं. यामुळे मी कालातीत अशा मोठया व्याप्तीत अगदी सहजपणे संचार करू शकले. त्यातील सामाजिक बदलांचा संदर्भ घेऊ शकले.

वेताळामुळे मला स्मशानाची जागा आणि अनेक प्रतिमा मिळाल्या. शिवाय जगभराचे संदर्भ सहजपणाने व्यक्त करता आले. याशिवाय स्मशानालाही माझ्या लेखनात खूप महत्त्वाचं स्थान मला देता आलं. स्मशानामुळे वातावरणाला एक अद्भुताचं वलय तर मिळालंच; पण लेखनाच्या सगळया पसार्‍याचा शेवट अधिक सकारात्मक होऊ शकला तो त्यामुळेच.

मानवी समाजात कोणत्याच गोष्टी केवळ सामाजिक संदर्भांना सोडून घडत नसतात, हा माझ्या मनातला ठाम भाव आहे. मी डाव्या चळवळीतली कार्यकर्ती असल्यामुळे हे लेखन विशेषकरून चळवळीच्या अंगाने अधिक व्हायला हवं होतं, असंही कदाचित काहीजणांना वाटू शकेल; पण मानवी समाजात जो मूलभूत बदल घडवायला हवा आहे, त्यात आपण ज्या काळात चळवळी करत आहोत, तो काळ एक टप्पा किंवा एक छोटासा तुकडाही असू शकतो. त्याचं महत्त्व आपल्या लेखी नेहमीच खूप असतं, कारण या घडवण्यातून आपण गच्च आणि अन्याय्य वास्तवाला बदलाच्या दिशेने नेण्याचा एक छोटासा धक्का मारत असतो. पण असे बदल घडवण्याचे संदर्भही ज्ञात संस्कृतीच्या अखंड प्रवाहात सामावलेले असतातच. यामुळे केवळ त्या एका दृष्टिकोनाला केंद्रस्थानी मानून हे लिखाण करू नये, असं मला वाटलं. पण त्यानिमित्तानं जे अभ्यास समोर आले ते आणि जिथे योग्य वाटलं तिथे त्याचे मी संदर्भही नमूद केले आहेत. यात मथुरा केसची कथा लिहिताना, केस हरल्यानंतरही कायद्यातच बदल मागणारं जे महत्त्वपूर्ण आंदोलन घडलं, त्याचा अगदी महत्त्वपूर्ण उल्लेख माझ्या लेखनात आलेला आहे. छाया दातार यांनी संपादित केलेलं 'दी स्ट्रगल अगेन्स्ट व्हॉयोलन्स' नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकात फ्लेव्हिया अ‍ॅग्नेस यांचा लेख महत्वाचा आहे. तो मुख्यत: बलात्कारविरोधात जी जी मोहीम घेतली गेली, त्याचाच उत्तम आढावा आहे. याच पद्धतीनं विचार केला तर, समाजवादी युगोस्लाव्हियामध्ये स्त्रियांना शिक्षण, समानता, नोकरी इत्यादीच्या संधी मिळाल्या. विविध वंशाच्या लोकांत अधिक सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्नही झाले. पण सोव्हिएत युनियनचा अंत आणि समाजवादी जगाचा जवळजवळ शेवट झाल्यानंतर जुन्या द्वेषाच्या गोष्टी पुन्हा आक्रमकपणे वर आल्या. तसं का व्हावं? युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर झालेल्या वांशिक दंगलींना आणि ओमारस्का इथल्या छळछावणी, स्त्रियांवरच्या बलात्कारांना कसं समजावून घेता येईल? हा प्रश्न खूपच व्यथित करणारा आहे. समाजवादाचा शेवट घडवून जगभर भांडवलशाहीचं, मुक्त अर्थव्यवस्थेचं जग निर्माण झालं की, सगळे प्रश्न संपणार, हेही खोटंच ठरलं. म्हणूनच भारतातल्याही औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या गुजराथमधल्या भीषण दंगलींना आणि बलात्करांना तरी आपण समजून घेऊ शकू का? असे अनेक प्रश्न महत्त्वाचे वाटल्यामुळेही केवळ डाव्या चळवळीच्या अंगानं मला लिखाण करणं शक्यच झालं नाही.

ज्या सामाजिक संबंधांच्या मुशीत बलात्कार घडताहेत, त्या सामाजिक संबंधांचा संदर्भ घेतल्याशिवाय बलात्काराचं धगधगतं वास्तव आपल्याला उलगडणार नाही, हे नक्की. म्हणूनच एका व्यापक सामाजिक संदर्भात हा प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

म्हणजे सुरुवात भारतातल्या प्रगतीच्या शिखरावर असलेल्या शहरांपासून होते. मग आपल्याला पोलिसी संरक्षणाची जेव्हा अपेक्षा असते, तेव्हा पोलीस चौकीत घडलेल्या हकिकती मांडल्या आहेत. पोलीस यंत्रणा ही एक दमनाची यंत्रणा आहे इथून मी पुढे न्यायव्यवस्थेकडे जाऊ शकले. मग जातिव्यवस्था, वंशवाद, बाजारीकरण ते युद्ध-दहशतवाद अशा गोष्टी अमानवी हिंसक पार्श्वभूमी तयार करतात, हे मी लक्षात घेतलं. या दीर्घ वाटचालीत संपूर्ण पुरुषी वर्चस्व आणि स्त्रियांवरचे अत्याचार सातत्यानं पुढे येत राहिले आहेत. बलात्कार हा अशाच सामाजिक मुशीत घडणारा, स्त्रियांना कमालीचा उद्वीग्नतेचा अनुभव देणारा! बलात्कार दमनाच्या इतर यंत्रणांना घेऊनच फोफावतो आहे हा माझा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळेच तांत्रिकदृष्टया बलात्कार झाल्यावर तक्रार कशी द्यावी किंवा बलात्कारी हल्ला झाला तर स्वत:चं संरक्षण कस करावं, अशा बाबींचा या लेखनात समावेश करता आलेला नाही.

मला पूर्ण कल्पना आहे, की या विषयाबाबतीत स्त्रीवादी व अन्य अभ्यासांमध्ये अनेक प्रकारच्या सैद्धांतिक भूमिका आहेत. वाद-प्रतिवाद पुढे आलेले आहेत. ते सर्व लक्षात घेऊन एखादं सैद्धांतिक लिखाण करावं, असं मात्र मला वाटलं नाही. कोणत्याही सैद्धांतिक लिखाणाची चळवळीला गरज असते, हे मान्य असूनसुद्धा मी त्या प्रकारच्या लेखनात पडले नाही. मात्र, अशा अभ्यासाचं एक व्यापक दालन त्या निमित्तानं उघडलं जावं, हा प्रयत्न माझा होता. अशा अभ्यासाकडे वळण्याची, कोणाला हे लेखन वाचल्यामुळे प्रेरणा झाली, तर या लेखनाचा थोडासा उपयोग झाला, असं मला नक्कीच वाटेल.

| रात्र १ |

बलात्कारी वेताळाचा शोध

बलात्कार! एक छळवादी अक्राळविक्राळ प्रश्न! अगदी वेताळच म्हणाना! त्याला पकडला पाहिजे, निग्रहपूर्वक. विक्रमादित्य राजासारखंच. म्हणजे काहीही झालं तरी हताश न होता, त्याला पकडायचा ध्यासच घेतला पाहिजे. अगदी चिकाटीही त्या विक्रमादित्यासारखीच ठेवली पाहिजे. तशीच वेळ आली आणि त्यानं काही अटीतटी घातल्या तरी त्या अटीही मानल्या पाहिजेत, पण त्याला सामोरं जाऊन त्याचा नाश करण्याचा धाडसी प्रयत्न केलाच पाहिजे. अशा या माझ्या मनाला घेरून बसलेल्या बलात्काररूपी वेताळानं मला वेडच लावलं. वेड लागेल नाही तर काय? रोजच्या रोज पेपरमध्ये बातम्या असतातच. अस्वस्थ करणार्‍या...

'शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला.'
'लग्नाचं आमीष दाखवून एका इराणी मुलीवर एका विद्यार्थ्यानं बलात्कार केला.'
'वडील वारल्यावर मदत करतो असं म्हणून वडिलांच्याच मित्रानं वारंवार अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला...'
'इंग्लंडमध्ये वडिलांनी स्वत:च्या मुलीवरच वारंवार बलात्कार केला. तिला तळघरात कोंडून ठेवलं होतं आणि या संबंधातून तिला मुलंही झालेली आहेत...'
'आय.टी.मध्ये इंजिनीयर म्हणून काम करणार्‍या मुलीला कॅब ड्रायव्हरनं पळवून नेलं. गळा चिरलेल्या अवस्थेत ती सापडली. प्रथम तिच्यावर बलात्कार केला गेला आणि मग खून...'
'मरीन ड्राईव्हवर मित्राबरोबर फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पोलीस चौकीत बलात्कार.'
'अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून पोलीस इन्स्पेक्टरकडून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार.'
'काश्मीरमध्ये राखीव दलाच्या पोलिसांनी केलेल्या बलात्कारावरून प्रचंड असंतोष.'
'गुजराथमध्ये मुस्लिम स्त्रियांवर, अगदी गरोदर स्त्रियांवरही बलात्कार.'
'आसाममध्ये मनोरमादेवीवर लष्कराच्या जवानांनी केलेल्या बलात्काराबाबत प्रचंड असंतोष...'

बातम्याच बातम्या...

सर्व प्रकारच्या माध्यमांतून रोज दिसणार्‍या, कानावर आदळणार्‍या. शब्दांतून बांधून वृत्तपत्राच्या कधी पाचव्या पानावर, तर कधी आठव्या पानावर झळकणार्‍या. अशा या वेताळाच्या सर्वव्यापी रूपानं मला अगदी त्रस्त करून टाकलं. शेवटी सारा धीर एकवटून मी निश्चय केला, हा बलात्काराचा वेताळ पकडून आणायचा आणि तो माणूसपणाच्या शोधात असणार्‍या समाजाच्या पुढे ठेवायचा. मानवतावाद्यांसमोर त्याचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी. गोष्ट अवघड होती, पण मला तिनं पछाडूनच टाकलं होतं. मी अखेरीस निर्णयच घेतला, त्याच्या कच्छपी लागण्याचा. त्यासाठी जास्तीत जास्त कष्ट किंवा त्रास सहन करण्याचीही मी तयारी केली. याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्याचा नाश केलाच पाहिजे. त्याला माणूसपणाच्या तांत्रिकाकडे नेलाच पाहिजे. माझं मन सततचा हट्ट धरून बसलं होतं.

त्याचं अस्तित्व शोधायचं कसं? हाच मोठा प्रश्न होता, कारण तो तर एखाद्या व्हायरससारखा सार्‍या हवेतच पसरलेला आहे, आणि आता प्राणवायूही त्यानं दूषित करून टाकला आहे. त्याचं मूळ रूप आणि खरं वास्तव्य शोधणार तरी कसं? मी विचारात पडले. लायब्रर्‍या शोधल्या. पुस्तकांच्या पानापानांतून त्याचा खरा पत्ता सापडतो आहे का ते मी बघितलं. पुराणकथांमध्ये डोकावले, मी पुराणवस्तू संग्रहालयातही गेले. शेवटी गूगल आणि इतर साइटींवर फिरले. बलात्कार जागोजागी दिसणारा, तरी पकडण्यासाठी कुठे सापडेल त्याचा मात्र अंदाज येईना. पकडणं अवघड असलं तरी मी ते आव्हान स्वीकारायचं ठरवलं. या वेताळाचं नाव आहे 'बलात्कार', मी स्वत:शीच अनेकदा पुटपुटत होते.

या वेताळाला शोधत मी शहराच्या रस्तोरस्ती, गल्लोगल्ली अशीच भटकत होते, आणि अचानक एका अतिशय जुन्या गूढ वाटणार्‍या स्मशानभूमीपाशी मी पोहोचले. का कोणास ठाऊक, पण त्या स्मशानभूमीच्या शेजारीच नवीन स्मशानभूमी असल्यामुळे जुन्या स्मशानभूमीच्या भल्यामोठ्या दरवाज्याला एक जुनंपुराणं कुलूप लावून ठेवलेलं होतं. 'येथे प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.' खूप जुना, रंग उडालेला, पत्रेही अगदी गंजलेले, वाकडेतिकडे झालेले, असा एक बोर्ड. तो लटकणारा बोर्ड मी विस्मयानं बघत राहिले काही क्षणच, आणि मला खात्रीनं वाटलं, याच आणि याच ठिकाणी मूळ वेताळाच्या स्वरूपात तो मला भेटणार आहे. बलात्काराचा वेताळ... वेताळ... वेताळ... दूर कुठूनतरी गूढ आवाज आल्याचाही मला भास झाला. वार्‍याची एक बारीकशी हालचाल मला स्पर्श करून गेली आणि त्या स्पर्शानं माझ्या अंगावर सरसरून काटाही आला. पण तरी माझं मन कुठेतरी जास्त आग्रही आणि फाजील विश्वासानं तरारून उठलं. आत प्रवेश कसा करावा या विचारात मी तिथेच उभी राहिले. तेव्हा मला जाणवलं, त्या स्मशानभूमीला असलेली ती काळ्या दगडांची कपाउंडची भिंत एके ठिकाणी बरीच ढासळलेली आहे. मातीचे ढीग आणि आत दिसणारी झाडंझुडपं. थोडे कष्ट घेतले तर मी आत सहज प्रवेश करू शकेन. काहीशी दचकून मी त्या जागेकडे काही क्षण बघत उभी राहिले.

मला जाणवलं, दिवस बराचसा रात्रीकडे झुकलेला होता. हे स्मशानच काहीसं आडबाजूला असल्यामुळे तशी फारशी वर्दळही तिथे नव्हती. ती पडकी भिंत चढून अखेरीस मी त्या स्मशानात प्रवेश केला. आधी जाणवली ती नीरव शांतता. मी तशीच चालायला लागले. आतली झाडं खूपच जुनी आणि अर्थातच घनदाट होती. वाटलं त्यापेक्षाही ती जागा गूढ वाटत होती. एका अजब घाणेरड्या कुबट वासानं भरलेली. मग मला जाणवलं, की तिथे मुस्लिम कब्रस्तानही आहे आणि ख्रिश्चन दफनभूमीही. याशिवाय एका शेडमध्ये काही प्रेतंही जळत होती, तर खूप लांबवर उडणारी गिधाडं पारशी समाजाच्या स्मशानाची मला साक्ष देत होती. सर्वांच्या स्माशानभूमी एकत्र नांदत होत्या, तरीसुद्धा तिथली शांतता भेसूरच वाटत होती. तलवारींचे, भाल्यांचे, बंदुकांचे आणि तोफांचे, कवायती सैनिकांच्या बुटांचे आणि घोड्यांच्या टापांचेही आवाज तिथे येताहेत की काय, असंही मला वाटलं. काही क्षण थबकून मी कानोसाही घेतला. त्या जागेनं मी भारावत चालले होते. खूप लांबवर मला एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. तिथे काही चिता पेटलेल्या होत्या आणि बर्‍याच स्त्रिया त्या चितांवर वारंवार सती जात होत्या. पण सती जाताना त्या आनंदानं जात आहेत, त्यांना कोणी लोटून दिलं आहे म्हणून जात आहेत, की अन्य कोणताच पर्याय नसल्यामुळे नाइलाजानं एकमेकींचे हात धरून चितेत उड्या मारताहेत याचा काही म्हणजे काही पत्ताच लागत नव्हता. हे सगळंच विलक्षण होतं. पुढे गेले तर, देशप्रेमाचं एक जुनं पुराणं मंदिर तिथं होतं. त्यावर तस चक्क लिहिलेलंच होतं, 'देशप्रेम मंदिर'. एखाद्या ऐतिहासिक पुराणवस्तुसंग्रहालयात पाटी असते तशा काळ्या पाटीवर रंग उडालेल्या पांढरट, धूसर अक्षरांत ते लिहिलं होतं. शिवाय दर्शनी भागातच एक पांढरा संगमरवरी आयताकृती दगड रोवलेला होता. तो काहीसा पिवळट झालेला होता. त्यावरची काही अक्षरं वाचायला येत होती. ती अशी - " सन १६४८ वेस्टफॅलीया शांतता करार ... ची स्मृती... तीस वर्षांचं दीर्घ युद्ध संपुष्टात आणून पवित्र रोमन साम्राज्य आणि फ्रान्स, स्वीडन, डच वगैरे रिपब्लिकनांनी हा शांतता करार केला. खर्‍या अर्थानं आंतरराष्ट्रीय कायद्यांचा पाया या करारामुळे घातला गेला. सतत लढाया करणारे राजे, सरंजामदार; एवढंच नाही, तर सर्वंकश सत्ता असणार्‍या चर्चच्या सत्तेलाही बाजूला सारून शासन करण्याची नवीनच पद्धत फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, इटली वगैरे युरोपीय देशात हळूहळू निर्माण झाली. या सगळ्या बदलांमध्ये व्यापारी वर्गाचा मुख्यत: पुढाकार होता. मग राष्ट्र किंवा देश निर्माण झाले. देशांच्या सरहद्दी आखल्या गेल्या. स्थानिक राजांचे नियम रद्द झाले. त्यांची जागा केंद्रीय एकछत्री अमलाने घेतली. देशी कायद्यांनी घेतली. उद्योगधंद्यांची भरभराट व्हावी म्हणून नवे कायदे जन्माला येण्याचा काळ सुरू झाला होता. छोट्याछोट्या सरदारांच्या सत्तेला लगाम बसला... ' असा बराच मजकूर, त्या भुरकट झालेल्या बोर्डवर होता. आणि आश्चर्य म्हणजे, अनेक देशांचे ध्वज त्यावर फडकत होते. शिवाय त्या जुनेपणात काहीसं नवं वाटावं असं रंग उडालेलं हिटलरचं तैलचित्र एका फ्रेममध्ये लटकत असलेलं मला दिसलं.

लढाया, युद्ध, महायुद्धांपासून पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि त्यानंतरही सुरू असलेल्या व्हिएतनामपासून इराकपर्यंतच्या अनेक लढायांमध्ये मेलेल्यांच्या नावाचा एक स्मरणस्तंभही त्या गर्दीत मला दिसला. कारण त्यावर एवढंच लिहिलेलं होतं, 'युगानुयुगे तिन्हीत्रिकाळी लढणार्‍या आणि त्यात मेलेल्या सैनिकांचा स्तंभ'. बरंच पुढे गेल्यावर, 'या भूमीवर महाभारतातलं युद्ध झालं', असं लिहिलेली एक पाटी होती. जगातलं पहिलं खरं महायुद्ध आणि याबद्दल तमाम हिंदू लोकांनी अभिमान बाळगला पाहिजे, असं मत त्यावर लिहिलेलं होतं. शिवाय त्याच जागेवर काही मातृदेवतांचेही खांब रोवलेले होते. तिथे खूप मोठी मोठी वडाची झाडं होती. हे सगळंच मला विलक्षण वाटत होतं. खाली पडलेल्या पाचोळ्यावर माझ्या पावलांचा आवाज उमटत होता आणि सुसाट वेगानं तिथे वाराही वाहत होता. असंख्य युगं पार करून एका विलक्षण ठिकाणी आपण प्रवेश केला आहे, या जाणिवेनं मी शहारून उठले. ती जागा कालातीत वाटत होती आणि माझी खात्री होती, की इथेच तो बलात्काररूपी वेताळ मला भेटणार आहे.

"बलात्काररूपी वेताळा बाहेर ये. मला खात्री आहे की तू इथेच लपलेला आहेस. मी तुला न्यायला आले आहे. बाहेर ये", मी ओरडले. एकदा, दोनदा, अनेकदा. आत्मविश्वासपूर्वक मोठ्याने, अजून अजून मोठ्याने. आणि मग अचानक गडगडाट झाला. आवाज ढगांचा. सुसाट वार्‍याच्या आगमनाची चाहूल देणारा आवाज. मग पुन्हा शांतता. मी पुन्हा ओरडले, "बलात्काररूपी वेताळा बाहेर ये. मी... मी तुझी प्रतीक्षा करतेय". नीरव शांतता आणि मला लगटून गेलेली एक वार्‍याची लकेर. नंतर.. नंतर अस्पष्ट असलेली वेताळाची एक आकृती माझ्यासमोर येऊन ठाकली. सार्‍या वातावरणात मला विलक्षण घुसमट जाणवत होती. पण मी निर्धारपूर्वक म्हंटलं, "हे तुझं थैमान अगदी असह्य झालं आहे. मला... मला बोलायचंय तुझ्याशी".

आता फक्त वारा वाहण्याचा गूढ आवाज येत होता. ती आकृती नाहिशी झालेली होती. मी पुन:पुन्हा तेच तेच बोलत ओरडत तिथे उभीच राहिले. आता फक्त शांतता होती आणि मी. असेही काही क्षण गेले आणि मग खदखद हास्याची एक लकेर वातावरणात घुमली. ती आकृती पुन्हा माझ्या समोर अवतरली. बलात्काराची वेताळी आकृती. मी तशीच उभी. निश्चल!

मग तो वेताळ काहीशा मैत्रीपूर्ण आवाजात मला म्हणाला, "प्रश्न इतकाही गंभीर नाही. शिवाय माझं अस्तित्वही जवळजवळ सगळ्यांनी मान्य केलं आहे. पण तू कशाला आलीस एवढ्या लांब?"
"खोटं, साफ खोटं. तुझं अस्तित्व कोणत्याच स्त्रीनं मान्य केलेलं नाही. तुझं आक्रमण कोणती स्त्री मान्य करेल? हाच तर पंचनामा एकदा करायला हवा आहे. अगदी पुरुषांवर झालेले बलात्कारही पुरुषांना मान्य असतात का? आणि मुलांवर झालेले बलात्कारही तितकेच घृणास्पद असतात. तुझं अस्तित्व संपवण्याची आता वेळच आलेली आहे", मी रागात उद्‌गारले.

पुन्हा शांतता आणि वार्‍याचा येणारा आवाज. पण आता माघार घेणं मला शक्यच नव्हतं. विक्रमवेताळाच्या त्या जुन्या गोष्टीनं आता नवं रूप घेऊन माझ्या मानगुटावर स्थान मिळवलं होतं. आता वेताळाला बरोबर घेऊनच माझा प्रवास सुरू होणार होता.
"प्रश्न गंभीर नाही असं कसं म्हणतोस? तूच तर तुझ्या अस्तित्वाचा खरा साक्षीदार आहेस. भारतापुरता विचार करायचा तर नीट ऐक", असं म्हणून इथे काय आणि कसे स्त्रियांवर बलात्कार सुरू आहेत, ते मी त्याला सांगायला सुरुवात केली. "आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात भारतात दर पंधरा मिनिटांना एक बलात्कार होतो. विशेष म्हणजे, ज्या शहरांना आम्ही प्रगतीची, स्वाभिमानाची केंद्रं मानतो, ती माहिती तंत्रज्ञानात घोडदौड करणारी मोठमोठी शहरं तर तुझ्याच तावडीत आहेत. म्हणजे अगदी आघाडीवरच आहेत. दिल्ली हे शहर देशाची राजधानी तर आहेच, पण दिल्ली शहरावर तुझीही हुकूमत चाललेली आहे. दिल्लीला बरीच लोकं हल्ली बलात्काराची राजधानी म्हणतात. तुझं संतापजनक अस्तित्व 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो'च्या माहितीमध्ये नोंदलं गेलं आहे. स्त्रियांची सुरक्षितता सगळ्यांत धोक्यात कुठे असेल, तर ती दिल्लीमध्ये. गेल्या वर्षी म्हणजे २००९मध्ये दिल्लीत एकूण ४५२ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आणि महाराष्ट्राच्या राजधानीत, म्हणजे मुंबईत झाली १७८ गुन्ह्यांची नोंद. म्हणजे दिल्लीपेक्षा कमीच, पण अर्थात शेजारीच आय.टी. केंद्र असणार्‍या पुण्यापेक्षा थोडी जास्त आहे ही संख्या. पण निव्वळ पुणे-मुंबई एवढ्यापुरताच कशाला विचार करायचा? आपण सगळ्या महाराष्ट्रालाच याबाबत विचारात घेऊयात".
मी तावातावानं बोलत आणि बोलतच सुटले होते. मोठमोठ्याने. हातवारे करत.

"महाराष्ट्र एकदम पुरोगामी आहे. तुझ्यासारख्या सैतानाला पायबंद घालायचा प्रयत्न तर शिवाजी महाराजांनीसुद्धा केला. जिंकलेल्या सैनिकांनी स्त्रियांशी कसं वर्तन केलं पाहिजे, याबाबत महाराजांचे नियम कडक होते. महात्मा फुले, शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, रानडे, आगरकर अशा स्त्रियांबाबत संवेदनाशील आणि सहानुभूती असणार्‍या कितीतरी थोरांची ही भूमी. प्रगतिशील विचारांची परंपरा असणार्‍या, सतीची चाल, विधवा केशवपन अशा अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवणार्‍या, मुलींसाठी शाळा काढणार्‍या स्त्रीहक्काच्या कितीतरी गोष्टी महाराष्ट्राच्या मातीत रुजवल्या गेल्या आणि अशा या महाराष्ट्रात निमूटपणानं आम्ही तुझं अस्तित्व स्वीकारायचं?", माझ्या मनातली सगळी तडफड मी व्यक्त करूनच भानावर आले.

थोड्या वेळानं त्याच्या हसण्याचा आवाज वातावरणात पुन्हा एकदा निनादला. आता त्याचा खुलेपणानं स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव मला करून देण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. शिवाय त्याच्या हसण्यात कुठेतरी स्वत:च्या विजयाची मोहर उमटवण्याचाही भाव होता. हा भाव अगदी संतापजनक होता. तो मला खिजवतो आहे, असं मला वाटलं.

"हे तू जे काय 'नॅशनल क्राइम ब्युरो' वगैरेचे आकडे देऊन सांगते आहेस, ते सगळं अगदीच किरकोळ आहे. तुला वाटतंय त्याहीपेक्षा माझं अस्तित्व सनातन आणि व्यापक आहे. म्हणजे स्त्रीच्या शरीरात बळजबरीनं प्रवेश करण्याचं माझं सामर्थ्य खूप खूप पुरातन आहे. ते पुरुषाच्या शरीराशी बांधलंच गेलेलं आहे. तू पुरुष जमातीलाच संपवणार आहेस का? कशाला काहीतरी नाद धरतेस?", त्यानं मला छद्‌मीपणानं विचारलं. मला त्याच्या या सगळ्याच बोलण्याचा खूपच राग आला.
"चूक, साफ चूक", मी किंचाळले. त्याच वेळेस मला वाटलं, अवतीभवतीच्या थडग्यातले सारेच सैनिक उठले आणि ते ब्राऊन मिलरनं तिच्या 'अगेन्स्ट अवर वील' या पुस्तकातल्या तिसर्‍या प्रकरणाच्या म्हणजे 'वॉर' याच नावानं असणार्‍या प्रकरणाच्याच्या सुरुवातीलाच दिलेलं सैनिकगीत ते गायला लागले.
हेच माझं शस्त्र, हीच माझी बंदूक
यानेच करतो काम, यानेच लुटतो गंमत...

या ओळींच्या खाली तिनं जनरल जॉर्ज एस. पॅटन ज्युनियर आपल्या 'वॉर अ‍ॅज आय न्यू'मधून काय म्हणतात हेही नमूद केलं आहे. ते म्हणतात, 'मी त्याला सांगितलं, की मी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले, तरी युद्धामध्ये काही बलात्कार होणे अपरिहार्य आहे. फक्त त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी म्हणून मी प्रयत्न करू शकतो.'

त्या वेताळानंही जेव्हा याच गोष्टीचा, म्हणजे पुरुषाला असणार्‍या लिंगामुळे तो बलात्कार करणारच, असा सनातन सूर आळवला आणि मृत सैनिकांनीही त्याला जेव्हा साथ केली, तेव्हा माझा जास्तच संताप झाला.
वरवर शारीर पातळीवर दिसणारी एक नैसर्गिक वेगळी बाब. केवळ त्याचमुळे किंवा स्पष्टच म्हणायचं तर पुरुषाला निसर्गानं वेगळं लिंग दिलं आहे म्हणून तो बलात्कार करतो, हे म्हणणं चूक आहे. साफ चूक. मी पुन्हा किंचाळून म्हणाले, "पुरुष हा बाईपेक्षा वेगळा असतो ही गोष्ट सत्यच आहे आणि त्याच्या या वेगळेपणाचं असं भांडवल तू किती काळ करणार आहेस? आता काळ पार बदलून गेला आहे. स्त्री आणि पुरुष हे स्वतंत्र आणि वेगळे घटक असले तरी ते एकमेकांचा आदर करू शकतात. सहकार्य करू शकतात. आपण प्रेम वगैरेसुद्धा बाजूला ठेवलं आहे. पण जो हैदोस तू चालवला आहेस आणि त्यासाठी हे होणारच किंवा हे होणं अटळच आहे, असं खदाखदा हसत सांगतो आहेस, ते आता होऊ द्यायचं नाहीये आणि म्हणूनच मी आले आहे तुला खांद्यावरून वाहून न्यायला. याचा निवाडा होईल संवेदनाक्षम मनुष्य संस्कृतीच्या वाहकांसमोरच. मानवतावाद्यांसमोर. स्त्री आणि पुरुष समसमान आहेत असं मानणार्‍यांसमोर. मानवीहक्कवाल्यांसमोर. तुला कळायला सोप जावं म्हणून समज, ते माणुसकीचे तांत्रिकच आहेत. मी म्हणते तिथे तुला माझ्याबरोबर यावंच लागेल". मला जे जे सुचलं ते ते मी बोलले. तो हसला. आता सुरुवातीला जे हसू होतं त्या पेक्षा जास्त मोठ्याने हसला. त्यात, माझी तो टिंगल करत असावा, असाच मला भास झाला.

"बघ जरा निरखून. हे माझं वास्तव्य ज्या भूमीत आहे तिथेच माझ्या सनातन अस्तित्वाची ग्वाही देणारी दोस्त मंडळी आहेत. हे अनेक युगं सतत लढाया करत राहिलेले पुरुषांचे मृतदेह आहेत. म्हणजे या स्मशानात कितीही आणि कुठेही खणून काढलं तर तुला हीच त्यांची शौर्यगाथा मातीच्या प्रत्येक कणात सामावलेली दिसेल. हे कधीच संपणार नाही. लढाया, युद्धं, महायुद्धं, जागतिक युद्धं आणि यांना सचेतन ठेवणारी कारणं जोपर्यंत सतत नव्या रूपांत जिवंत राहिली आहेत, पुढेही राहणार आहेत, तोपर्यंत माझी त्यांना साथ राहणार आहे. या सगळ्या उलाढालीत माझी साथ त्यांना कदाचित काही काळ आत्मसन्मानच देऊन जाते."
वेताळाचं हे सगळंच वक्तव्य अतिशय संताप आणणारं होतं.
"ठीक आहे, युद्धाचा मुद्दा जरा मी बाजूलाच ठेवते. पण एरवीचं काय? कुठल्याही कारणासाठी तुझं अस्तित्व मानवी समाजात आवश्यक नाही. आणि यासाठीच तुला माझ्याबरोबर आलंच पाहिजे".मी तिथेच तशीच ठाम उभी राहिले. पुन्हा त्या वातावरणात एक जीवघेणी शांतता जाणवली. एव्हाना त्या स्मशानाला बरीच जाग आल्यासारखं वाटत होतं. ज्यूंच्या कत्तली आणि स्त्रियांवर बलात्कार करणारे, स्वत:ला खरे आर्य समजणारे हिटलरचे पाईक त्यात होते. तसेच युरोपमध्ये वेगवेगळ्या धर्मयुद्धांमध्ये स्त्रियांवर बलात्कार करणारे महापुरुषही त्यात होते. बांगलादेशात स्त्रियांवर बलात्कार करणारे पाकिस्तानी सैनिक होते. तसंच हिंदू-मुस्लिम दंग्यांमध्ये दोन्ही बाजूच्या स्त्रियांवर बलात्कार करणारे हिंदू-मुस्लिमही त्यात होते. सहस्र प्रेतांचा सडलेला, कुजलेला वास त्या वातावरणात भरून राहिलेला आहे, असंच मला वाटलं.

"बोल, येतोस का नाही माझ्याबरोबर? एक वेताळ त्या विक्रमादित्याबरोबर जायचा ना? मग तसाच तू माझ्याबरोबर चल", मी त्याला म्हणाले. काही वेळ पुन्हा त्या वार्‍याचा गूढ आवाज. आणि मग त्याचा आवाज. आता काहीसा बदललेला. "ठीक आहे. मी येईन, पण माझ्याही काही अटी असतील. वाटेत तुझं कोणतंही भाषण मी ऐकणार नाही. किरकोळ प्रश्न चालतील. पण शक्यतो तू मौनच पाळलं पाहिजेस. पण मौन ही अट नाही. भाषणाला बंदी!"
"हो, म्हणजे चर्चेच्या ओघात जे बोलणं होईल त्याला काही भाषण म्हणता येणार नाही".
"ठीक आहे", तो म्हणाला. नंतर मात्र त्यानं त्याची ती अगदी महत्त्वाची अट मला सांगितली. तो म्हणाला, "मी तुला गोष्टी सांगेन आणि नंतर कदाचित काही प्रश्नही विचारेन. आणि प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही तू जर दिलं नाहीस तर मात्र या खेळाचा शेवट होणार आहे. म्हणजे तुझा लगेच त्या क्षणी तिथे अंत होणार आहे. तुझ्याही मस्तकाच्या हजारो चिंधड्या होतील, आणि तुझा आहे तिथेच मृत्यू होईल. आणि जेव्हा माझ्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुला देता येणार नाही, त्या ठिकाणी तू हरलेली असशील. तोही तुझा एका अर्थानं शेवटच असेल. तेव्हा तू मला शरण आलेली असशील. माझी गुलामी तुला पत्करावी लागेल. मी तुझं नक्की काय करेन ते आता सांगणार नाही. मान्य?" मी त्याच्या अटी मान्य करून टाकल्या. अगदी क्षणाचाही विलंब लावला नाही. कारण तो बरोबर येणार हेच माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असणार होतं.
"आणि अजून एक अट आहे", तो पुढे म्हणाला.
"आता काय?", मी गोंधळून विचारलं. त्या स्मशानात आता बरेच चित्रविचित्र आवाज यायला लागलेले होते आणि आता मला तिथून बाहेर पडायची घाई झाली होती.
"हे बघ, आपला हा सगळाच प्रवास सूर्यास्तानंतर एक तासानं सुरू होईल आणि सूर्योदयाच्या पूर्वी तो संपेल. त्या तुमच्या रोडावलेल्या आणि लोकांनी दूषित करून टाकलेल्या नदीकिनार्‍याच्या रस्त्याने मला घेऊन जायचं, मान्य आहे?" मी त्याच्या या नव्या अटीला मान्यता दिली आणि वेताळाला मानगुटीवर बसवून मी तिथून निघाले.

आता न संपणारा एक रस्ता सुरू झालेला असतो. वेताळ काहीसा पुन्हा टिंगल केल्यासारखा हसतो. मला म्हणतो, "काहीही म्हण, तुझा एक मुद्दा मी थोडा विचारात घेतो आहे. म्हणजे युद्धाचा मुद्दा आणि त्यात होणारे बलात्कार आपण जरा बाजूला ठेऊयात आणि अगदी आजच्याच युगातल्या मॉडर्न गोष्टींचा विचार करूयात. मी तुला माझ्या अस्तित्वाचा अटळपणा सांगणार आहे. मी तुला पहिल्यांदा काही प्रसंग सांगणार आहे. सांगणार आहे त्या गोष्टी खर्‍याच आहेत. अगदी हेलावून टाकणार्‍या किंवा तुझ्यासारख्यांच्या मनातला संताप जागा करणार्‍या".
"ऐकते आहेस ना?", तो मला विचारतो. मी मानेनेच होकार भरते. मग तो मला सांगायला लागतो.
"आपण सुरुवातच करूयात या तुमच्या आधुनिक युगातल्या आधुनिक शहरापासून. म्हणजे असं, की हे युग, तुम्ही म्हणता ना, की माहिती तंत्रज्ञानाचं आहे. स्त्रियानी शिकावं की नाही, त्यांनी नोकरी करावी की नाही, हे सगळेच प्रश्न मागे फेकून दिलेला असाच हा काळ म्हणावा लागेल. दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैद्राबाद अशी तुमच्या भारतात निदान ३२-३३ तरी शहरं आहेत, ज्यांचा तसं म्हंटलं तर सगळा चेहरामोहरा अगदी सारखाच वाटतो. ते उड्डाण पूल, ते शॉपिंग मॉल्स, ती रेस्टॉरंट्‌स् आणि मुख्य म्हणजे ती आय.टी. पार्क्‌स्, रात्रीही लखलखत्या सूर्यप्रकाशासारखी चमकणारी शहरं. तरीही प्रत्येक शहराला तसं स्वत:चं एक छानसं स्वतंत्र अस्तित्व आहे, जे त्याच्या भूतकाळाशी, सांस्कृतिक वेगळेपणाशीही बांधलं गेलं आहे. तर अशा शहरांतसुद्धा माझा संचार किती सहज आहे याच्याच काही गोष्टी मी तुला सांगणार आहे", तो म्हणाला. मी ऐकायला उत्सुक झाले होते, पण त्यानं मला एकदम जाणीव करून दिली दिवस उजाडत असल्याची. त्याच्या अटीप्रमाणे आता तो निघून जाणार होता. गोष्टही नाही आणि प्रश्नही नाही. मी जरा खट्टूच झाले. तर तो मला म्हणाला, "हं, मी जे तुझ्याशी बोलणार आहे, त्याची चर्चा कोणाही बरोबर करायची नाही हे कायम लक्षात ठेव. उद्या रात्री आज जिथे भेट झाली तिथेच भेट होईल आपली", आणि तो गेला. तो गेल्याचं मला जाणवलं. काही क्षण आहे त्याच जागी मी अगदी दगडी पुतळ्यासारखी उभी राहिले. हे सगळं अनपेक्षितपणे घडलेलं होतं. परिसर अगदी नेहमीसारखा होता, तरी माझ्यासाठी मात्र सगळंच आरपार बदलून गेलेलं होतं. मी भानावर आले. मंद पावलांनी मी स्वत:च्या नादात घराकडे निघाले. दिवस आत उजाडायला लागला होता.

आता अजून काही वेळ, म्हणजे तब्बल बारा तास तरी मला त्याची वाट बघावी लागणार होती. काय सांगणार तो गोष्ट? कोणाची असेल? मला विलक्षण हुरहूर लागली होती. काय होणार आहे पुढे? हे सगळं खरं आहे की खोटं? या सगळ्यांतून काय निष्पन्न होणार आहे? मी घरी आले तरी त्या विलक्षण घटनेतून मी बाहेर येऊ शकले नाही. माझा त्या भेटीवर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या अटी आठवून तर मला अजूनच गुदमरल्यासारखं वाटत होतं. नशीब, अगदी पूर्णपणे मौन बाळगण्याचं बंधन त्यानं माझ्यावर लादलं नव्हतं. जुजबी का होईना, मला बोलायला परवानगी दिली होती.

स्वत:चं अस्तित्व त्यानं सनातन म्हणून जाहीर करून टाकलं होतं. मी विचार करत होते सारखाच त्याचा आणि त्याच्या गूढ अस्तित्वाचा. रात्रभर जागी असून मला कणभरही थकवा आलेला नव्हता, पण तरीही मी इतकी बेचैन होते की मला काहीही सुचत नव्हतं. मी नुसतीच डोळे मिटून खुर्चीवर बसले. किती वेळ गेला असेल कोण जाणे... मी खुर्चीतल्या खुर्चीत डोळे मिटत होते आणि मला सारखा तो वेताळ आठवत होता, ज्याला मानवतावादी समाजपुरुषासमोर मला आणायचं होतं.

काही पुस्तकं वाचून मला माहीत झालं होतं की, हजारो वर्षांपूर्वी माणसानेच भुतं, यक्ष, देव, दानव अप्सरा, गंधर्व, वेताळ, पिशाच्च इत्यादी गूढ प्राणी प्रथम निर्माण केले, नंतर त्यांच्या राहण्याच्या जागा, स्थळे, प्रदेश व लोक निर्माण केले. मानवी संस्कृतीचा हा खोलवर रुतलेला अजब गूढ प्रकार माझ्या आयुष्यात साकार झाला होता.
बराच विचार करून मी त्या वेताळाची भेट, त्याचं ते गूढ अस्तित्व अखेरीस स्वीकारलं. मान्य केलं. मला तो पुन्हा भेटला पाहिजे असं मला वारंवार वाटायला लागलं. मनातल्या शंका बाजूला काढत काढत मी त्याची वाट बघायला लागले. तो पुन्हा भेटेल या कल्पनेनंही मला जरा हायसं वाटलं. मग उजाडलेला तो दिवस मी असाच ढकलला आणि त्याने बंधन घातलेल्या वेळेच्या काहीशी आधीच मी त्या गूढ स्मशानभूमीपाशी पोहोचलेही.

***

नग्नसत्य
बलात्काराच्या वास्तवाचा
अंतर्वेध

लेखिका - मुक्ता मनोहर
मनोविकास प्रकाशन
मूल्य : ३०० रुपये
पृष्ठसंख्या - ३००

***

लेखिकेचा परिचय -

मुक्ता मनोहर - डाव्या चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ती. शिक्षण - एम.ए (समाजशास्त्र) व बी. कॉम. १९७५पासून प्रत्यक्ष चळवळीत सहभाग. स्त्रियांना, कामगारांना, असंघटीत कष्टकर्‍यांना दिल्या जाणार्‍या दुय्यम स्थानाविरोधातील, त्यांच्यावरील अन्यायाविरोधातील विविध चळवळींत सहभाग. महाराष्ट्रातील बिडी कामगार, कापड कामगार, गिरणी कामगार, महिला कामगार, नर्सेस, बालवाडी शिक्षिका इत्यादी विविध स्तरांतील श्रमिकांच्या आंदोलनांत सहभाग.

एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार (२००६), श्रीमहालक्ष्मी ट्रस्ट आदिशक्ती पुरस्कार (२००६), डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीचा बा-बापूंच्या नावाचा कार्यकर्ता पुरस्कार (२००३) इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख वाचनात आलेला. पुस्तकाव्यतिरीक्तदेखिल या विषयावर त्यांचं जे काम चालू आहे त्यात सहभागी होण्यासाठी त्या लेखात त्यांनी आवाहन केलं होतं. त्यानंतर एकदा पुस्तक चाळायला मिळालं एका दुकानात. भारी आहे.
छान लेख.. Happy

ही त्या लेखाची लिंक
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=195...

प्रथमदर्शनी शैली नाही आवडली.
तरीही एकाच भागावरुन मत बनवणे योग्य नाही . म्हणून कदाचित वाचेन.

धन्यवाद चिनूक्स.

पुस्तक फालतू असाव,

आपण ज्या विक्रम वेताळच्या गोष्टी आणि मालिका बघितल्या त्यात वेताळाने विक्रमची मदत केलेली आहे , त्याचे प्राणही वाचवले आहेत वरील पुस्तकात वेताळाला ज्या भूमीकेतून पाहिल गेल आहे त्याने मला लेखिकेच्या बुध्दीची किव येते,

मुळातच समाजाची एकच बाजू मांडताना दुस-या बाजूवर अन्याय होउ नये एवढ लेखकानं समजल पाहिजे. लग्नाच आमिष दाखवून बलात्कार या गोष्टीला कायदा जरी बलात्कार म्हणत असेल तरी ते सदसदविवेक बुध्दीला पटण्यासारखे नाही कारण अशा प्रकारात स्त्रीच्या संमतीने या गोष्टी घडलेल्या असतात.तसेच आणखी काही कारणांच आमिषवजस वडील वारल्यावर मदत करतो वगैरे अशा प्रकारात त्या स्त्रीचीही त्याच प्रमाणात चूक आहे हे लेखिकेला समजत नसाव .

अक्षरशः का ही ही आहे. इतके वाईट दिवस आलेत काय नवीन मराठी पुस्तकांना?

'मनोगत' तर माझ्या डोक्यावरुन गेले.

>>मी डाव्या चळवळीतली कार्यकर्ती असल्यामुळे हे लेखन विशेषकरून चळवळीच्या अंगाने अधिक व्हायला हवं होतं,
म्हणजे काय?

>>सोव्हिएत युनियनचा अंत आणि समाजवादी जगाचा जवळजवळ शेवट झाल्यानंतर जुन्या द्वेषाच्या गोष्टी पुन्हा आक्रमकपणे वर आल्या. तसं का व्हावं?
समाजवादाचा शेवट घडवून जगभर भांडवलशाहीचं, मुक्त अर्थव्यवस्थेचं जग निर्माण झालं की, सगळे प्रश्न संपणार, हेही खोटंच ठरलं.

काय संबंध?? आधी सगळं छान चालू होतं की काय? बाईंनी डावी बाजू सोडलेली नाही. Wink

तुमचे सर्व म्हणणे बरोबर! एकदम मान्य!! पण या प्रकाराबद्दल स्त्रियांनी अधिक सजग आणि सावध असले पाहिजे. समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजून साफ झला पाहिजे, हे जितके महत्वाचे, तितकेच (आणि मी हे एक स्त्री असून बोलते आहे की वासानांधता जितकी कारणीभूत आहे तितकेच) स्त्रियांचे अमर्याद आणि काही प्रमाणात बेताल वागणेही बदलले पाहिजे.अनेकदा लोकलमधून जाताना सोबतच्या स्त्रियांचे चित्रविचित्र आणि उत्तान पेहेराव पाहिले, त्यांचे एकमेकींशी चाललेले बोलणे ऐकले की शरमेने मान झुकते. फॅशन च्या नावाखाली भडक मेकअप, उत्तान पेहेराव, हाय कल्चर्ड आहोत हे दाखवण्यासाठी चाललेल्या 'त्या' चर्चा करायच्या आणि मग समोरच्याचा तोल ढळला की समोरच्याला दोष द्यायचा हे कितपत योग्य आहे? आणि ज्या स्त्रिया समाजात चारचौघांत सभ्यतेने, मर्यादेने वागतात त्याच्यवर असे प्रसंग येताच नाहीत. आपल्या नजरेतल्या जरबेने असली की समोरचला धाक बसला पाहिजे तर कसले काय स्त्रियाच आशा प्रसंगांना आमंत्रण देतात. की आणि माझ्या तरी मते ज्या मुली, स्त्रिया हुशारीने/ अकलेने वागतात त्यांच्याबाबतीत सद्यकथित प्रमाण अत्यल्प आहे. कोणत्याही व्यक्तीला एका मर्यादेच्या आत ठेवावे. आपल्या आयुष्यात परक्याला फार दखल घेऊन देवू नये. एवढे जरी झाले तरी भरपूर होईल. मग आपण पुरुषांना दोष देऊ शकतो जेव्हा आपण आपल्याकडून निर्दोष आहोत.

सोव्हिएत युनियनचा अंत आणि समाजवादी जगाचा जवळजवळ शेवट झाल्यानंतर जुन्या द्वेषाच्या गोष्टी पुन्हा आक्रमकपणे वर आल्या. तसं का व्हावं? >>> हे वाक्य मलाही अप्रस्तुत वाटलं.

मनोगत आवडलं. पण रैनाप्रमाणेच प्रकरण वाचायला सुरूवात केल्यावर ते पकड घेत नाहीये हे लक्षात आलं. (तस्लिमा नसरीनच्या 'लज्जा'प्रमाणे या पुस्तकाची अवस्था नसली म्हणजे मिळवली. कारण हा विषयही अतिशय संवेदनशील आहे.)
अर्थात १-२ पानं वाचूनच निष्कर्ष मांडणं अगदी चुकीचं आहे - हे ही मान्य आहे.

विक्रम-वेताळ कथेचा आधार आणि स्मशानाची प्रतिकं मात्र आवडली.

लोकसत्तामधला लेख वाचला होता. त्यातला आणि इथल्या मनोगतातला बराच भाग एकसारखा आहे. (अर्थात, लेखिकेचं मनोगत दहा ठिकाणी एकसारखंच असणार म्हणा.)

सुहासिनी २७ (उर्फ साधना - हे सदस्यत्व अवलोकल्यावर सुचलं),

तुमच्यासाठी पहिल्यांदाच टाळ्यांचा कडकडाट माझ्या एकट्याकडून तरी!

लैंगिक शोषणाचा धागा निघाला तेव्हाच तुम्ही असतात तर ....... काश!

असो!

आता साटोसं प्रतिसादांच्या वादळास सिद्ध व्हा असा अतिशय अवांतर प्रतिसादरुपी सल्ला!

==================

पुस्तकाबद्दल माझे स्पष्ट मतः

लेखिकेने अभ्यासपुर्वक काही लिहिले आहे. हा विषयही ज्वलंत आहे. त्याला एकदम फालतू, अक्षरशः काहीही अशी विशेषणे कशाला लावायची?

मी हे पुस्तक विकत घेऊन वाचणार आहे.

धन्यवाद चिन्मय! Happy

परिचयासाठी!

-'बेफिकीर'!

सुहासिनी ताई, अतिशय छान आणि मार्मिक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मी देखील आपल्या मताशी सहमत आहे. संस्कृती आणि विकृती यांच्यामधील रेषा आता धूसर होऊ लागली आहे. त्यामुळे असे प्रकार घडतात .
जर प्रत्येक स्त्रीने आपले स्त्रीत्व मर्यादेत राहून पाळले तर "रामराज्य" फार दूर नाही. पुन:च्छ धन्यवाद.

" पण सोव्हिएत युनियनचा अंत आणि समाजवादी जगाचा जवळजवळ शेवट झाल्यानंतर जुन्या द्वेषाच्या गोष्टी पुन्हा आक्रमकपणे वर आल्या" हे वाक्य युगोस्लाव्हियाच्या संदर्भात लिहिलेले दिसते.(संपूर्ण जगातल्या बलात्काराच्या घटनांसंदर्भात नव्हे.) (युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन सर्बिया, क्रोएशिया हे देश निर्माण झाले ना?) दोन गटातल्या दंगलीत मग त्या धार्मिक असोत की वांशिक स्त्रियांवरचे हल्ले लैंगिक असतात, हे तर मान्य आहे ना?

संपूर्ण परिच्छेद : "समाजवादी युगोस्लाव्हियामध्ये स्त्रियांना शिक्षण, समानता, नोकरी इत्यादीच्या संधी मिळाल्या. विविध वंशाच्या लोकांत अधिक सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्नही झाले. पण सोव्हिएत युनियनचा अंत आणि समाजवादी जगाचा जवळजवळ शेवट झाल्यानंतर जुन्या द्वेषाच्या गोष्टी पुन्हा आक्रमकपणे वर आल्या. तसं का व्हावं? युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर झालेल्या वांशिक दंगलींना आणि ओमारस्का इथल्या छळछावणी, स्त्रियांवरच्या बलात्कारांना कसं समजावून घेता येईल?"

http://www.opendemocracy.net/5050/rebecca-johnson/rape-basic-tool-of-mil...

काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती. आफ्रिकेतल्या एका देशातले रिबेल्स विरोधी गटातल्या पुरुषांवरही बलात्कार करायचे. अशा बलात्कारी पुरुषाला त्याच्या स्वतःच्याच लोकांमध्येही स्थान उरत नसे.
http://www.guardian.co.uk/society/2011/jul/17/the-rape-of-men

"समाजवादाचा शेवट घडवून जगभर भांडवलशाहीचं, मुक्त अर्थव्यवस्थेचं जग निर्माण झालं की, सगळे प्रश्न संपणार, हेही खोटंच ठरलं. म्हणूनच भारतातल्याही औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या गुजराथमधल्या भीषण दंगलींना आणि बलात्करांना तरी आपण समजून घेऊ शकू का? असे अनेक प्रश्न महत्त्वाचे वाटल्यामुळेही केवळ डाव्या चळवळीच्या अंगानं मला लिखाण करणं शक्यच झालं नाही" : आर्थिक समता आणि सुबत्ता आली की सामाजिक समता आपसूक येईल असा भाबडा विश्वास असणारे लोक नाहीतच का?

>>ज्या स्त्रिया समाजात चारचौघांत सभ्यतेने, मर्यादेने वागतात त्याच्यवर असे प्रसंग येताच नाहीत.>> -१

हा धागा हायजॅक करण्यात मला इंटरेस्ट नाही. पण राहवले नाही म्हणून.

मयेकर, लेखिका भाबडी नाही. Proud एका गंभीर विषयाबद्दल लिहितानाही स्वतःचा अजेन्डा सोडलेला नाही याचा राग आला.
विक्रम वेताळ तर अचाटच आहे. असो.

@बेफ़िकीर ... १००% अनुमोदन
>>ज्या स्त्रिया समाजात चारचौघांत सभ्यतेने, मर्यादेने वागतात त्याच्यवर असे प्रसंग येताच नाहीत.>> -१
वागण्याच्या मर्यादा प्रत्येकाला असाव्यात, तिथे स्त्रि/पुरूष भेदभाव नकोच

लेखिकेनं म्हंटलंय की

>> म्हणूनच भारतातल्याही औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या गुजराथमधल्या भीषण दंगलींना आणि
>> बलात्करांना तरी आपण समजून घेऊ शकू का? असे अनेक प्रश्न महत्त्वाचे वाटल्यामुळेही केवळ डाव्या
>> चळवळीच्या अंगानं मला लिखाण करणं शक्यच झालं नाही

शिवाय आजून एका ठिकाणीही म्हंटलंय की

>> 'गुजराथमध्ये मुस्लिम स्त्रियांवर, अगदी गरोदर स्त्रियांवरही बलात्कार.'

या दोन्ही ठिकाणी मुस्लीम महिला पीडित आहे असं उघडपणे अथवा संदर्भाने सूचित केलं आहे. यास माझी हरकत नाही. मात्र केरळात आणि उर्वरित भारतात फोफावणार्‍या लव्ह जिहाद ला बळी पडलेल्या हिंदू स्त्रियांविषयी चकार शब्द काढला नाहीये. काश्मिरात हिंदू महिलांची तिसाव्या वर्षी कूस उजवणे बंद होते. हेही भीषण मनोलैंगिक अत्याचारामुळेच! त्याही वारंवार बलात्कराच्या शिकार होताहेत. हिंदू स्त्रियांच्या जीवाची हीच किंमत आहे काय? की काश्मीर भारताचा भाग नाही?

शेवटी आपला 'डावेपणा' दाखवलाच लेखिकेने. भले आव काहीही आणला असेल.

नाही म्हणायला एका ठिकाणी हिंदूंना मुस्लीम बलात्कर्‍यांच्या जोडीस आणून बसवले आहे.

>> तसंच हिंदू-मुस्लिम दंग्यांमध्ये दोन्ही बाजूच्या स्त्रियांवर बलात्कार करणारे हिंदू-मुस्लिमही त्यात होते.

चला हेही नसे थोडके.

वाईट अशाचं वाटतं की एक संवेदनशील विषयाचं चित्रण लेखिका स्वत: एक स्त्री असूनही स्त्रीच्या दृष्टीकोनातून झालेलं नाही. व्यक्तिगत राजकीय चष्मा डोळ्यावर चढलाच! (की काढलाच नव्हता?)

लेखिकाबाईंना प्रतीकात्मक स्मशानात युरोपातले कुठलेसे करारबिरार दिसतात. पण भारताची भीषण फाळणी दिसत नाही. लेनिन आणि स्टालिनचे भयानक अत्याचारही आठवत नाहीत.

उगीच प्रतीकांच्या मागे लागून एका संवेदनशील विषयाची वाट लावलीये.

स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पहिल्याने तिच्यावर अत्याचार करायला माणसं (पुरुष आणि स्त्रिया दोन्ही) धजतात. जिथे स्त्रियांना पुजले जाते तिथे देवतांचा वास असतो हे सांगणारी सनातन भारतीय संस्कृती वरील मजकुरात कुठेच डोकावत नाही. मूळ पुस्तकात दिसत असेलशी आशा ठेवण्यात अर्थ नाही. कारण सनातन या शब्दाचा विपर्यास केलेला दिसतो. सनातन म्हणजे नित्यनूतन हा अर्थ जगभर प्रचलित आहे. मात्र इथे लेखिकाबाईंनी बघा काय लावलाय :

>> ...म्हणजे पुरुषाला असणार्‍या लिंगामुळे तो बलात्कार करणारच, असा सनातन सूर आळवला ...

काय म्हणावं याला आता? जी भारतीय संस्कृती इंद्रियांवर संयम राखायला शिकवते, तिच्या सनातन या विशेषणाचं अवमूल्यन करायला लेखिकेला काहीच कसं वाटलं नाही?

चालायचंच!

-गा.पै.

सुहासिनी२७ ,
' ज्या स्त्रिया समाजात चारचौघांत सभ्यतेने, मर्यादेने वागतात त्याच्यवर असे प्रसंग येताच नाही'' --- अरे वा!! कोणत्या जगात वावरता तुम्ही जरा बाकीच्यांनाही द्या पत्ता, सगळ्यांनाच बघू दे असा मुलुख.

अनेक प्रतिक्रीया आंधळ्या वाटल्या.

स्त्रियांच्या पेहरावावरुन त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरु नये. तो ठरतो असे काही म्हणतात.

काही इतर लोक हिंदु धर्माने स्त्रियांना पुजनीय मानले आहे असे काहिसे पुराणेमत नोंदवतात.
पुस्तकाच्या नावातील 'सत्य' वरुनच कळावे की लेखिकेला पुस्तकी ज्ञानात किंवा इतिहासात रमण्यात मतलब नाही.

विवाहीत स्त्रियांवरील लग्नांतर्गत बलात्काराची प्रकरणे म्हणजे लग्न, मग बलात्कार आणि मग फारकत असे नसुन वर्षानुवर्षे बलात्कार असा प्रकार असतो.

अमेरीकेतील बातमी देऊन मला भरकटवायचे नाही, पण ही तीनच दिवसांपुर्विची आहे, आणि पार्टनरकडुन झालेल्या हल्ल्यांबद्दलची आहे.

http://www.npr.org/templates/story/story.php?storyId=143712761

याबद्दल जास्त बोलुन स्त्रियांनी (आणि पुरुषांनी) इतर स्त्रियांना त्यांच्याविरुद्धच्या अन्यायाविरुद्ध बोलायला व झगडायला उद्युक्त करायला हवे.

गापै , सनातन या शब्दाचे eternal आणि orthodox असे दोन इंग्रजी प्रतिशब्द आहेत.

म्हणजे पुरुषाला असणार्‍या लिंगामुळे तो बलात्कार करणारच, असा सनातन सूर आळवला: इथे सनातन इटर्नल या अर्थाने आला आहे. यात भारतीयच का, कुठलीही संस्कृती कुठे दिसली?

सुहासिनी यांनी पुस्तकाचा परिचय, मनोगत, अंश यातल एकही अक्षर न वाचता प्रतिसाद दिलेला दिसतोय.

ठोकळेबाज परिक्षणाच्या भानगडीत न पडता पुस्तकातीलच मनोगत आणि पहिलं प्रकरण देण्याची कल्पना अतिशय उत्तम!

शैली वगैरे दिसण्याइतपत लिखाण इथे दिलच गेलं नाहीये. तसच एव्हड्यावरुनच काही मत देणंही अयोग्यच. मनोगत अत्यंत रटाळ. पहिल्या प्रकरणावरुन, काही अत्यंत अनावश्यक संदर्भांकडे दुर्लक्ष करुनही, विषयाप्रमाणेच पुस्तकही सनातन वाद-प्रतिवादांत अडकणार असे वाटत असतानाच शेवटच्या काही परिच्छेदांत पुढे वाचण्याची उत्सुकता चाळवते हे नक्की.

Pages