भटक्या विमुक्त जाती - एन्टी फोर

Submitted by तुषार इंगळे on 22 December, 2010 - 02:36

सन २०११ ची जनगणना जातींवर आधारीत असणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातींचा आढावा घेण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीच्या बैठकीचा तपशील आणि निष्कर्ष याबाबतचे हे इतिवृत्त.

बैठक पहिली
अध्यक्ष : आपल्या महाराष्ट्रात आज बर्याच संख्येने ह्या भटक्या विमुक्त जाती आहेत, ज्यांना कायद्याच्या अंतर्गत आणुन त्यांना सांवैधानीक संरक्षण द्यावे आणि पुढिल वर्षी जनगणना करताना मोजायला सोपं व्हावे ह्यासाठी आपण इथे जमलो आहोत.

सदस्य २ : सर! पण संविधानात आधीच एनटी म्हणुन एक जमात आरक्षीत केलेली आहे, त्या सुद्धा भटक्या विमुक्त जाती (आदीवासी) आहेत. मग पुन्हा हा प्रपंच कशासाठी.

अध्यक्ष : ते काय आहे, की तो विषय आपल्या कक्षेबाहेरचा आहे, तेव्हा ह्या जातीत कोण कोण येतं, ते दिसायला कसे आहेत, त्यांची वेषभूषा, संस्कृती, त्यांची दैवतं, त्याच्या राहण्याच्या जागा ह्या सर्वांचा शोध घेण्यापुरतीच आपली चौकशी मर्यादीत राहिल.

सदस्य १ : पण अध्यक्ष महोदय आपण ही सर्व माहिती कशी आणि कुठे गोळा करायची...?

अध्यक्ष : ही जमात आपल्याला सह्याद्रीच्या डोंगरात, गडकिल्ल्यात मिळेल असा माझा अंदाज आहे.

सदस्य २ : बहुतेक ही जमात खाली तळकोकणात आणि समुद्रकिनारच्या काही भूईकोट आणी पाणकोट किल्ल्यांमध्ये ही मिळण्याची शक्यता आहे.

अध्यक्ष : तर माननीय सदस्य, ’भटक्या विमुक्त जाती प्रकरण’ पहिल्या बैठकीत आपल्या कामाची दिशा स्पष्ट झालेली आहेच. यासंबधी प्रत्यक्ष कृती काय करता येईल, याचा विचार आपण समितीच्या पुढील बैठकीत करणार आहोत. तेव्हा चहा बिस्कीटांच्या आस्वादानंतर आपली ही बैठक संपेल. सदस्यांनी जाण्यापुर्वी व्हाऊचरवर सह्या करुन मीटींग भत्ता घेण्यास विसरु नये, बरंय, भेटूच!

बैठक दुसरी
अध्यक्ष : माननीय सदस्यांचे स्वागत. ’भटक्या विमुक्त जाती प्रकरण’ चौकशीसंबंधीची ही आपली दुसरी मीटिंग. मला वाटत, आता आपण प्रत्यक्ष चौकशी सुरु करायला हवी.

सदस्य १ : निश्चितच करायला हवी.

सदस्य २ : मला वाटत आपण पुणे मुंबईच्या सर्व रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांपासून सुरु करायला हवी.

अध्यक्ष : अगदी बरोब्बर. ह्या भटक्या जाती पुणे-मुंबईतच जास्त प्रमाणे आढळतात, आणि ही जमात रेल्वे आणि एसटी बस ने नक्कीच प्रवास करत असणार म्हणून तुम्ही म्हंटल्याप्रमाणे आपण रेल्वे आणि बस स्थानकांपासून चौकशी सुरु करायला हवी.

सदस्य १: माननीय अध्यक्षांनी तसे आदेश देऊन समितीच्या रेल्वे स्थानक आणि बस स्थानक प्रवेशाची व्यवस्था करावी.

अध्यक्ष : निश्चितच. मी आजच तसे पत्र संबंधीत मंत्रालयात पाठवून देतो. आजच्या ह्या बैठकीत चौकशीच्या दिशेने अत्यंत महत्वाच्या निर्णय घेन्यात आलेला आहे, त्याबद्दल मी सदस्यांचे अभिनंदन करतो. चहा आणि बिस्कीटे संपल्यावर सदस्यांनी भत्ता घेताना व्हाऊचरवर सही करण्यास विसरु नये. बरंय, भेटू पुन्हा.

बैठक तिसरी
अध्यक्ष : ’भटक्या विमुक्त जाती प्रकरण’ चौकशी समितीच्या या तिसर्या बैठकीत सर्वांच स्वागत. माननीय चौकशी समितीनं पुणे-मुंबईच्या रेल्वे आणि बस स्थानकांवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

सदस्य १ : सर! हे लोक सोमवार ते शुक्रवार ’नाईलाजाने’ आपला धंदा वा नोकरी करतात. शुक्रवारी रात्री सीएसटी स्थानकाच्या मोठ्या घडाळ्याखाली हे लोक जमतात, बहुदा ह्यांची ही भेटण्याची खास जागा असावी.

सदस्य २ : सर! पुण्यात हे लोक स्वारगेट किंवा शिवाजीनगर च्या बस स्थानकावर नेहमी दिसतात. शनिवारी पहाटे हेच लोक मुरबाड, कसारा, कर्जत, लोणावळा ह्या एसटी स्टॅण्डवर दिसतात.

सदस्य १: हो सर. आणी शनिवार दुपार ते रविवार दुपार हे लोक कुठल्यान कुठल्या गडावर असतात.

सदस्य २ : ’भटक्या विमुक्त जातींच्या चौकशीत समितीनं ही माहिती अचूक शोधून काढली आहे, त्यासाठी मी समितीच्या सदस्यांचे अभिनंदन करतो.

अधय्क्ष : समितीच्या सदस्यांना बहुधा अश्या प्रकारच्या कामाचा पुर्वानुभव नसावा त्यामुळे ते अशी विधाने करीत आहेत.

सदस्य १: माननीय अध्यक्षांनी काय ते स्पष्ट बोलावे.

अध्यक्ष : चौकशीच्या समितीनं आपली चोकशी लवकर संपेल किंवा संपली आहे असं वाटेल अशी विधाने करु नयेत. पुणे-मुंबईच्या तुलनेत राज्यात इतर आणखी बस स्थानके आणि रेल्वे स्थानके आहेत, ही जमात नक्की कूठल्या गडावर जाते काय काय करते याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्यासाठी महाराष्ट्राभर दौरा आयोजित करण्यात यावा यासाठी समिती अर्ज पाठवणार आहे. याबाबत सदस्यांना काय वाटतं.

सदस्य १+२ : आम्ही माननीय अध्यक्षांशी सहमत आहोत.

अध्यक्ष : तुर्तास समितीच्या बैठकांमध्ये बिस्कीटांएवजी सॅंडविच देण्यात यावे, ही मागनी मान्य झालेली आहे. तेव्हा माननीय सदस्यांनी सॅंडविच, चहा आणि नंतर भत्ता घेऊनच जावे.

बैठक चौथी
अध्यक्ष : प्रदिर्घ कालखंडानंतर ’भटक्या विमुक्त जामाती’ प्रकरण चौकशी समितीची बैठक होत आहे. राज्यभरातील बस आणि रेल्वे स्थानके व गड-किल्ल्यांची यादरम्यान समितीने पाहणी केली आहे.

सदस्य १: सर! ह्या लोकांचा चेहरा बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात . त्यातही French beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या. काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात.

सदस्य २: हो सर! ह्यांचे केस एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब. मुले मुली दोघांचेही.

सदस्य १: सर ह्यांची वेषभूषा ही सामान्य माणसांपासून फार वेगळी असते असा निष्कर्ष समितीने काढला आहे.

अध्यक्ष : तुम्हांला नक्की म्हणायचं काय आहे..?

सदस्य २: सर सोमवार ते गुरुवार हे लोक चेक्सचा शर्ट, जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टू म्हणतात. त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.

सदस्य १ : आणि सर शुक्रवारी रात्री हे लोक निघण्याच्या तयारीत असतात. ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट, कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच), पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट).

सदस्य २: सर हे लोक कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसर्या club बरोबर ट्रेकला जातात. ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत. साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात. कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो. पण किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी किंवा वायु प्रदुषण जरुर करतात. त्यातही त्यांची फारशी चूक नसते. रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते.
बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी .

सद्स्य १: सर ह्यांचे यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते, एखाद्या सराईत गृहिणीसारखे. उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घडीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी, तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी, यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते सर यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते . एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला. सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .

अध्यक्ष : माननीय समितीने 'भटक्या विमुक्त जमाती' प्रकरण ह्याबाबत सखोल चौकशी केलेली दिसते, त्याबाबत समितीचे अभिनंदन. समितीने केलेला इतका तपास हा अत्यंत आवश्यक होता, या निष्कर्षाला समितीचे सदस्य आले असून सरकारला तसे कळविण्यात येईल. आज मीटिंग जास्त वेळ चालणार हे लक्षात घेता सदस्यांसाठी बिर्याणी मागवण्यात आली आहे. तिचा आस्वाद घेऊन सदस्यांनी भत्ता घेऊन घरी जावे आणि हो व्हाउचरवर सह्या करायला विसरु नका.

बैठक पाचवी
अध्यक्ष : 'भटक्या विमुक्त जमाती' प्रकरण चोकशीच्या ह्या पाचव्या बैठकीत आपल्या सर्वांचे स्वागत. आपली ही समिती ह्या जमातीच्या चौकशीच्या संधर्भात आणखी कुठल्या निष्कर्षावर आली आहे.

सदस्य १ : सर ह्या जमातीच्या खाण्यापिण्याच्या सवयी अगदी वेगळ्या आहेत. कशालाही नाही म्हणणार नाहीत, हवे ते हक्काने मागून घेणार. काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड. बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे, श्रीखंड पाव, केळ पाव खाणे इत्यादी. पाणी अतिशय जपून वापरतात. बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते. बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही.

सदस्य २ : सर गडावर असताना ह्यांची खाही खास करमणुकीची साधने आहेत. खणखणित आवाजात पोवाडे गाणे, जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे.

अध्यक्ष : हे लोक कुणाची साधना वगैरे करतात का किंवा ह्यांची दैवत कोण कोणती आहेत..? याबाबत समिती काही प्रकाश टाकू शकते का..?

सदस्य २: सर आहेत ना. हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना फार मानतात. त्यानंतर रायगडचा जगदीश्वर, हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर, रतन गडचा अमृतेश्वर इ.

सदस्य १: सर ह्यांची काही तिर्थस्थळे सुद्धा आहेत. जसे राजमाचीचा तलाव, बाण चा ब्लू लगून, नाणे घाटातील केव्ह, कोंकण कडा इ . आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते.

सदस्य २: सर ह्या जमातीबाबतीत बरेचसे गैरसमज सुद्धा पसरलेले आहेत जसे यांना मुली आवडत नाहीत
हे बाबासाहेब पुरंदरयाना खुप मानतात. वगैर वगैरे.

सदस्य १: सर ह्यांची ही जमात इतकी लोकप्रिय आहे की ह्याच्यावरुन काही म्हणी आणि वाकप्रचार सुद्धा साहित्य क्षेत्रात वापरले जाते उदाहरणार्थ. १. खाईन तर तुपाशी, नाहीतर adjust करेन. 2. वाट पाहीन पण ST नेच जाईन.. 3. Cave मधे आला वारा गेला वारा, तो कोणाचा सोयरा. 4. An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber..

अध्यक्ष : समितीच्या सदस्यांचे अभिनंदन. 'भटक्या विमुक्त जमाती' प्रकरण चौकशी संधर्भात आपली ही समिती योग्य मार्गाने जात आहे. आपला हा लिखीत अहवाल सरकारला सादर करण्यापुर्वी ह्या जमातींची सरकारकडे काय अपेक्षा आहेत ह्याचा सुद्धा समितीने योग्य रित्या अभ्यास करावा. मागच्या मीटिंगप्रमाणे
ही मीटिंग सुद्धा दिर्घ काळ चालली त्यासाठी बिर्याणी एवजी चिकन मसाला आणि कोंबडी वडे (खास मालवणी पद्धतीचे) मागविण्यात आले आहे तेव्हा सदस्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि घरी जाण्याआधी भत्ता घेउन जावा.

बैठक सहावी
अध्यक्ष : 'भटक्या विमुक्त जमाती' प्रकरण चौकशी संदर्भात असलेल्या सहाव्या बैठकीत आपल्या सर्वांचे स्वागत. समितीने केलेल्या चौकशीचा अहवाल सरकारला सादर करण्याआधी ह्या जमातीच्या साधारण अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी समितीला मुदत वाढवून मागण्याच्या संधर्भात आजच प्रस्ताव पाठविण्यात येईल. समितीने अत्यंत महत्वाची माहिती मिळवली असून, त्यासंबधीचा अधिक तपशील शोधण्यासाठी मुदतवाढ आवश्यक आहे. मीटिंग भत्ता वाढवून देण्यासंबंधीचा प्रस्तावही सरकारला सादर करण्यात आलेला आहे.

सदस्य १+२ : समितीच्या अध्यक्षांच्या नेत्रूत्वाखाली 'भटक्या विमुक्त जमाती' प्रकरण चौकशी अनेक वर्षे सुरु राहील, याची आम्हांला खात्री आहे.

गुलमोहर: 

मागे रविवारच्या लोकसत्ता मध्ये 'दोन फुल' तंबी दुराई ह्या स्थंभामध्ये 'आदर्श घोटाळा प्रकरण ह्या संबंधीत एक विडंबन छापून आले होते. आणि माझ्या एका मित्राने 'ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखाव'' ह्याबाबत एक मेल पाठवला होता. बस ह्या दोन्ही विडंबनांना एकत्र करुन पाहिलं. नक्की सांगा कसं वाटलं.