छत्रपति शिवराय - जीवन रहस्य ...

Submitted by सेनापती... on 17 January, 2011 - 22:06

छत्रपति शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकारांनी त्यांचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे. 'कै. नरहर कुरुंदकर' हे असेच एक प्रभावी लेखक. त्यांनी लिहिलेल्या 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' या पुस्तकात त्यांनी असेच काही वेचक आणि वेधक विचार मांडले आहेत.

इतिहासाच्या वाचकांना 'नरहर कुरुंदकर' माहीत असले तरी सामान्य वाचकांना मात्र ते 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावनेतून माहीत आहेतचं. रणजीत देसाई यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रातून त्यांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा यशस्वीपर्यंत केलेला आहे.

हे लिखाण 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' आणि श्रीमान योगीची प्रस्तावना यावरून लिहिलेले आहे.

**********************************************************************************************************************

समाजाला नेहमीच नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना १६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५० वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.

शिवरायांच्या नेत्रुत्वाचा विचार जेंव्हा जेंव्हा पडतो तेंव्हा २ प्रश्न समोर येतात ...
१. खुद्द औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत का उतरला ???
२. १६९२ नंतर आपण ही लढाई पूर्णपणे जिंकू शकत नाही, हे माहीत असुनही पुढची १५ वर्षे लढत का राहिला ???

त्याच्यासारख्या कसलेल्या युद्धनितीतज्ञ आणि मुत्सद्दी अश्या बादशहाला महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यातल्या डोंगराळ भागात वसलेले छोटेसे राज्य बूडवण्यात अपयश का आले??? औरंगजेबाने केलेल्या तयारीवरुन हे स्पष्ट दिसते की त्याने ही लढाई साधी - सोपी नक्कीच समजली नव्हती. लाखोच्या फौजा जातीने घेउन उतरणे यावरुनच ते स्पष्ट समजते. लाखोने मुघल फौजा सीमेवर उभ्या असताना अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपतींना मृत्यू आला. पण तरीही राजधानी पासून दूर राहून, दरवर्षाला कोट्यावधी खर्च करून आणि उत्तर भारतात अव्यवस्था निर्माण होउन देखील औरंगजेब अखेरपर्यंत लढत राहिला. त्याने अनेक लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. मराठ्यांना अपुऱ्या साधन-सामुग्रीवर मोघलांचा पराभव करणे शक्य नव्हते. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितिमध्ये मराठे लढत राहिले. छत्रपति संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षे आणि त्यांच्या वधानंतर १९ वर्षे जनता लढत राहिली. पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, रामराजा ह्यांनी सुद्धा परकियांविरुद्ध प्रखर लढा दिला. पण जिकडे जनता लढते तिकडे फौजा निकामी होतात. भारताच्या इतिहासात १२०० वर्षांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी जनता अखंड २७ वर्षे लढली. हयात धर्माभिमान नव्हे तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास जास्त महत्वाचा आहे. छापे घालण्याचे नवे तंत्र निर्माण करणे, वीरतेच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाउन 'लढून मरणे' यापेक्षा - टिकणे, गरज असल्यास पळणे, मग पळवणे, थकवणे आणि अखेर नाश करणे हे जास्त महत्वाचे. यासोबत प्रजेच्या इहलौकिक गरजा सांभाळणे आलेच. यानंतर धर्माभिमान महत्वाचा. एखादे राज्य टिकवण्यासाठी जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्तानच्या इतिहासात सर्वात जास्त रोमांचक आहे... नवखी आहे...

शिवछत्रपतींच्या कार्यपद्धतीचा विचार अधिक तपशीलवारपणे समजुन घेणे महत्वाचे आहे. 'शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.' सन १६४५ ते १६४९ ही ४ वर्षे बारा मावळची व्यवस्था लावण्याचे काम अखंड सुरू होते. वतनदारांचा बंदोबस्त करणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे ही सर्वात महत्वाची कामे ह्या काळात केली गेली. सामान्य असणाऱ्या मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे आणि प्रतापराव गुजर अश्या व्यक्तिंमधून असामान्य कर्तुत्ववान प्रधान, सेनापति, सुभेदार निर्माण करणे हा महाराजांचा आणखी एक पैलू.

शिवरायांचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वैशिष्ट्य ह्यात आहे की, जेंव्हा त्यांना माघार घ्यावी लागली, अपयश आले किंवा ताब्यातला प्रदेश होरपळून निघाला; तरीसुद्धा लोकांचा त्यांच्यावरील विश्वास तसूभरही कमी झाला नाही. एखादा चुकार माणूस वगळता त्यांच्या फौजेने कधी बंद पुकारले नाही. १६४९ मध्ये सुद्धा सर्वच अनिश्चित असताना लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले असे लोकांना त्यांनी दिले तरी काय होते ??? त्यांचे वैशिष्ट्य यात आहे की, ते जेंव्हा-जेंव्हा जिंकत तेंव्हा-तेंव्हा नवा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेत आणि जेंव्हा पड़ती घेत तेंव्हा नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचा काही भाग सोडून देत असत. म्हणजेच पुढच्या वेळी लढण्याची शक्ती त्यांनी सुरक्षित ठेवलेली असते. जन्मभर त्यांनी ह्याच पद्धतीने कारभार पाहिला. त्यांचे चौरस नियोजन आणि युद्ध आखणीला राज्य विस्तारात रूपांतरित करण्याचे श्रेय अप्रतिम आहे.

भारतीय राजांमध्ये ते एक असे एकमेव निराळे राजे आहेत, ज्यांनी सदैव संभाव्य परीणामांचा विचार केला. युद्धाच्या योजना आखताना भूगोलाचा विचार केला. त्यासाठी त्यांनी कोकणपट्टी आणि वरघाटचे नकाशे बनवून घेतले होते. त्यांचे 'हेरखाते आणि भौगोलिक नियोजन' हा त्यांच्या युद्ध नेतृत्वाचा महत्वाचा पैलू आहे. १६४८ मध्ये फत्तेखानाला पराभूत केल्यानंतरही सिंहगड आदिलशाहीला परत करणे ह्या मागे कुशल नियोजन आहे. १६४८ मध्ये शहाजी राजांची सुटका झाल्यावर छोट्याश्या स्वराज्याला खानस्वारी पेलवणार नाही हे त्यांना लगेच उमगले होते. जावळी जिंकल्याशिवाय 'अफझलखान' या प्रश्नाला उत्तर नाही हे त्यांना १६४९-५० लाच उमगले होते. ती संधी राजांना १६५६ ला मिळाली. जावळी मागोमाग त्यांनी पुन्हा सिंहगड काबीज केला आणि आदिलशाहीला उघडउघड आव्हान दिले. १६५९ च्या खानस्वारीपर्यंत जो वेळ राजांना जावळीत मिळाला, त्यावेळात जावळीच्या दुर्गम खोऱ्यात प्रत्येक माणूस - 'हे राज्य टिकले पाहिजे' या त्वेषाने पेटून उठला असला पाहिजे.

खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला ??? राजांनी की खानाने ??? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधा पाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य ... !!!

"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय..."
शाहिस्ते खान प्रकरण असो नाहीतर सूरत लूट, शत्रूला प्रत्येक ठिकाणी नवनवीन पद्धतीने थक्क करून त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे.

२२ हजाराची फौज घेउन आलेला खान, त्यामागोमाग ३२००० फौज घेउन आलेला सिद्दी जोहर, ६०००० च्या आसपास फौज घेउन उतरलेला शाहिस्तेखान ह्या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. पुढे मिर्झाराजा सुद्धा लाखभर फौज घेउन दख्खनेत उतरला. एवढे प्रचंड ओझे राज्यावर असताना , १ तप यातना भोगून, जाळपोळ, नासधूस, नुकसान सहन करूनही जनतेची निष्ठा तसूभर देखील कमी का झाली नाही ??? या लोकांना राजांनी असे काय दिले होते ??? बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुतपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???

अनेक साहसी लढाया आणि पराक्रम ह्याचा अंत पुरंदरच्या तहात झाला. १६ वर्षे खपून जे मिळवले ते एका क्षणात तहात गेले. या तहावरुन समजुन आले की ज्यांच्याविरुद्ध राजे लढत होते ते किती बलाढ्य होते. पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला. या पराभवाचा परिणाम नेताजी पालकर वर झाला आणि त्याने स्वराज्याची साथ सोडली. १६५९ ते १६६५ या काळात जे कणखरपणे लढले ते प्रचंड कसोटयांमधून बाहेर पडले. राजे आग्र्यामध्ये असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला. राजा अटकेत असताना देखील फौजा बंड करत नाहीत आणि जनतेचा विश्वास कमी होत नाही हे महत्वाचे आहे. आग्र्याहून सुटून आल्यावर शिवरायांनी स्वतः औरंगजेबाला पत्र लिहून तह मोडणार नसल्याचे कळवले होते. १६६७ ते १६६९ ह्या वर्षात उठावाची जोरदार तयारी केली गेली पण गेलेला एकही किल्ला घेण्याचा पर्यंत केला गेला नाही. मात्र १६७० च्या सुरुवातीपासून अवघ्या ५ महिन्यात सर्व किल्ले मराठ्यान्नी जिंकून घेतले. हे अजून एक थक्क काम. १६७१-७२ ह्या काळात तर खानदेश - बागलाण - बुरहाणपुर - जालना - व्हराड ह्या सर्व मोघल भागात छापे घालून लूट मिळवणे आणि अस्थिरता निर्माण करणे हे काम जोमाने सुरू होते. या सर्व घडामोडीसोबत १६५७ पासून आरमाराची उभारणी करून समुद्रावर छापे घालण्याचे तंत्र विकसित करणे, व्यापारी नौका उभारणे, नविन किल्ले उभारणे आणि हाती आलेले किल्ले दुरुस्त करणे असे चौरस उपक्रम सुरू होतेच.

हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला. राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांची राहणी वैभव संपन्न होती पण उधळी नव्हती. राज्याचे सिंहासन ३२ मणाचे बनवणारा राजा सूती वस्त्रात, लाकडी पलंगावर झोपत असे. चित्र, शिल्प आणि संगीत ह्यांना आश्रय देणे यासाठी ना त्यांच्याकड़े वेळ होता ना पैसा. त्यांना मोठ्या मोठ्या ईमारती बांधण्याची फुरसत देखील नव्हती. दुष्काळात लाखो लोक अन्न-अन्न करीत मरत असताना २० कोट रुपये खर्चुन ताजमहाल बांधण्यात त्यांना रस नव्हता किंवा त्यांच्या मनाचा तो कल देखील नव्हता. अकबराने हिंदूंना औदार्याने वागवले, तर राजांनी मुसलमानांना औदार्याने वागवले. त्यांच्याकडून आक्रमणाची भिती होती तरीही. हिंदूंकडून अशी भीती कधीच नव्हती. राजांनी सर्वांना समान वागवले ते भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे तर स्वयंभू औदार्य म्हणुन.

ते कुशल सेनानी होते, युद्धतज्ञ होते. या खेरीज ते मुलकी कारभाराचे तज्ञ होते. प्रजेच्या ईहलौकिक कल्याणाची जबाबदारी आपली आहे, हे त्यांना पुरेपुर माहीत होते. प्रजेवर निरर्थक कर त्यांनी कधी लादले नाहीत. (सिंहासनपट्टी हा जादा कर सुद्धा त्यांनी वतनदारांवर लावला.) 'मी शत्रूंना दगा दिला, पण मित्रांना दगा दिल्याचे दाखवा' असे जाहिर आव्हान त्यांनी दिले होते. त्या आव्हानाला आजतागायत उत्तर आलेले नाही. कौल देऊन गावे बसवणे, बीघे-चावर जमीन मोजणे, जमीन लागवडीखाली आणणे, बी-बियाणे - नांगर-बैल यासाठी कर्ज देणे, शेतसारा निश्चित करणे असे विधायक उपक्रमही त्यांनी केले. त्यांच्या काळात उत्पन्नाच्या ४० टक्के कर होता. आजही हा कर लहान नाही. तरी सुद्धा लोकांनी २/५ ही वाटणी आनंदाने स्विकारली. कारण कर दिल्यावर पक्षपात न होता संपूर्ण संरक्षण आणि न्याय याचे आश्वासन मिळायचे. 'पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी' हे त्यांच्या राजवटीचे एक गमक आहे. कारण त्यांनी हक्क वतनदारांकडे न ठेवता स्वतःकडे घेतले.

भाषा सुधारण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश', पंचांग सुधारण्यासाठी 'करण-कौस्तुभ', धर्मात शुद्ध करून घेणे हे सुद्धा त्यांनी केले. स्त्रीची अब्रू निर्धोक केली. त्यासाठी स्वतःचा निष्ठावान सरदार सखोजी गायकवाड ह्याचे हातपाय तोडण्यास कमी केले नाही. फौजेला शिस्त लवली. गावातून काही फुकट घेऊ नये असा दंडक केला. आपल्या फौजेतल्या ३०० लोकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडले. कारण बळकटपणे तलवारी हातात घेणारे हात ह्यापेक्षा शासनामागे उभा राहणारा जनतेचा हात त्यांना जास्त महत्वाचा होता. 'मुलकी सत्ता ही लश्करी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे' हे सांगणारा आणि त्यावर वाटचाल करणारा असा माणूस भारताच्या इतिहासात एकमेव आहे. म्हणुनच तर समर्थ त्यांना 'शिवकल्याण राजा' म्हणतात. स्त्रियांचे व गुलामांचे आठवडी विक्री बाजार त्यांनी बंद करवले. तर विरोधकांच्या धर्मग्रंथांचा व पूजास्थानांचा त्यांनी सदैव आदर केला. अतिशय संयमी आदर्श गृहस्थजीवन ते जगले. निर्दोष व सुखी राज्यकारभार केला.

स्वतः शुन्यातून राज्य निर्मिती करून 'हे श्रींचे राज्य' आहे अशीच त्यांची वागणूक राहिली. म्हणुन तर ते श्रीमंत योगी झाले. त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे आपला आत्मविश्वास जागा करणाऱ्या एका युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो...

वंदे मातरम... वंदे शिवराय...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहन छान लिहिल आहेस. आणि खरच मनापासुन धन्यवाद इथ दिल्याबद्दल. बर्‍याच गोष्टी नुसत्या माहिती असतात पण त्यांचा विस्तार किती मोठा आहे हे कळत हे वाचल्यावर

फारच आवडला.

(नेताजी पालकरवर पुरंदर तहाचा काय परिणाम झाला ते कृपया विस्ताराने सांगावेत. कारण तो एक अफाट शूर माणूस होता. तो कशामुळे विभक्त झाला नेमका? कारण काही पुस्तकांमध्ये तो पन्हाळ्याला वेळेवर पोचला नाही म्हणून त्याला बडतर्फ केले असे आहे. )

लेख अप्रतिम!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(अवांतर - मध्यंतरी झालेल्या एका चर्चेत कुणीसे म्हणाले होते की शिवरायांचा कारभर धोरणी नव्हता, त्या मुद्याला हा लेख हे सुंदर उत्तर आहे.)

बेफिकीर... तुम्ही बरोबर वाचले आहे... Happy

नेताजी (नेतोजी असाही उल्लेख आढळतो) हा खरच अफाट शूर माणूस होता. 'प्रती शिवाजी' म्हणून त्याची त्याकाळी ख्याती होती असे म्हणतात. पुरंदरच्या तहाप्रमाणे शिवाजी राजांनी मुघलांना आदिलशाही विरुद्ध युद्धात मदत करायची असे मान्य केले होते. त्याप्रमाणे जानेवारी १६६६ मध्ये आदिलशाही मुलुखावर स्वारी करण्यास ते पन्हाळा येथे जाण्यास निघाले. नेताजी पालकर हा काही कारणाने वेळेवर पोचू न शकल्याने मराठ्यांच्या हल्ल्यावर परिणाम झाला आणि मराठ्यांची १००० माणसे कामी आली. (त्यावेळेला १००० हा आकडा किती मोठा असेल हा विचार बघता ही नक्कीच मोठी चूक होती. )

ह्याबद्दल राजांनी नेताजी वेळेवर न आल्याबद्दल दोष लावला आणि त्याला सरनौबत पदावरून दूर केले. ह्यावर संतापून नेताजीने राजांची साथ सोडली आणि तो आदिलशाहीत गेला.. पुढे काही महिन्यातच आधील मोठी मनसब मिळाल्याने तो मुघलांना सामील झाला. नेताजी मागून राजांनी कुडतोजी गुजारांना 'सरनौबत' पद बहाल करत 'प्रतापराव' ही पदवी दिली.

सेतू माधवराव पगडी म्हणतात...
"On 16th june Shivaji reached Panhala base & led assault. His general Netaji Palkar, did not made it in time. The assault failed with loss of 1000 men. Shivaji got angry on Netaji & withdrew him from post of general. Netaji Palkar sooner left Maratha forces & joined Vijapur & finally joined hands with Mughals with offer of bigger Mansab.

Netaji’s defection illustrates how even officers nearest to Shivaji failed to understand the significance of the struggle which he was waging."

नेताजी सोडून जाण्याचा चांगला एक परिणाम पण झाला असे म्हणतात. जिथे मरणाच्या दारातही एकही सैनिक आपल्या स्वामिनिष्ठेवर पाणी फिरू देत नाही तिथे अपमानावरून एवढा मोठा सरदार आणि राजांचा उजवा हात मानला जाणारा नेताजी तडकाफडकी राजांना सोडून जाईल याची मिर्झा राजांना खात्री वाटेना. त्यांना असे वाटू लागले की हा शिवाजी महाराजांचा डाव आहे आणि कदाचित शिवाजीपण उद्या अदिलखानाला सामिल होऊन आपल्यावर एकत्रितपणे चालून येईल. त्यामुळे त्यांनी थोडे नरमाईचे धोरण स्वीकारले आणि राजांची मर्जी राखण्याचा प्रयत्न केला.
यात किती खरे किती खोटे माहीती नाही..पण वाचण्यात असे आले आहे.

माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुतपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???>>ह्या एव्हढ्या वाक्यात "शिवाजी" ह्या मंत्राचे सार आहे.

शिवाजीमहाराजांनी मराठी माणसांना स्वातंत्र्याची चटक(चांगल्या अर्थाने) लावली. हा फार मोठा सामाजिक बदल होता, आणि म्हणूनच, त्यांच्या आणि नंतर शंभूराजांच्या मृत्यूनंतरही मराठे लढतच राहिले.
मराठ्यांना हे जाणवलं होतं, की आता जर हे राज्य टिकवण्यासाठी लढलं नाही, तर पुन्हा एकदा सुलतानी अत्याचार आणि आपला बळी जाणं हे अटळ आहे.
पक्का भटक्या, खूप छान माहिती आहे तुमच्या लेखातही.
थोडसं अजून वाचायचं असेल तर..
http://puputupu.blogspot.com/2010/10/original-photo-chhatrapati-shivaji....

मी वर जे लिहिलंय त्याला या ब्लॉगचा संदर्भ आहे. हा कुणा इतिहास्कराचा ब्लॉग आहे का माहिती नाही. म्हणजे मी सगळं वाचलं नाहिये अजून. (पुढे यावरून काही वाद होऊ नयेत अशी आशा आहे.) पण जे लिहिलय ते खोटं/ न पटण्यासारखं नसावं.

अप्रतिम. शिवाजीमहारा़जांबद्द्ल वाचताना महाराष्ट्रात जन्मल्याचा नेहमीच अभिमान वाटतो.

आशुचँप... ह्याबद्दल मी ऐकलेले नाही पण मिर्झाराजाला ठावूक होते की जर विजापूर राजांच्या मदतीला धावून आले तर त्यांना ही लढाई जड जाईल. परंतु राजांनी विजापूरकडे तशी मागणी करूनही तसे झाले नाही. एका मुसलमान सत्तेला हरवण्यासाठी विजापूर आदिलशाह एका हिंदू - मराठ्याला मदत करायला तयार नव्हते.

तहानंतर सुद्धा ते एकत्र येऊ नयेत यासाठी मिर्झाराजाला बरेच कष्ट घ्यावे लागले. शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती. त्याचसाठी तहात शिवाजी मुघलांना विजापूर विरुद्ध लढाईत मदत करेल, लढाई करून प्रदेश जिंकून देईल असे कलम घातले. ह्यातच नेताजी प्रकरणाचा उगम आहे. ह्याचसाठी मिर्झाराजाने शिवाजी राजांना उत्तरेत पाठवले. औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो,'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.'

प्रज्ञा९... महाराजांना सुद्धा ह्या कामी अनेक घटकांची बरीच मदत झाली. 'मराठी सत्तेचा उत्कर्ष' हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.

मी तो ब्लॉग पाहिला.. त्यात जे चित्र दिले आहे ते राजांचे आहे की नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही. गेली २ वर्षे हे चित्र मला अनेकांकडून आले आहे, त्याबद्दल विचारणा झाली आहे.. असो.. मी सर्व वाचले नाही.. Happy सवडीने वाचायला सुद्धा अनेक दिवस लागतील..

इंग्रजीमध्ये राजांबद्दल काही उत्तम वाचायचे असेल तर सेतू माधवराव पगडी यांचे पुस्तक वाचावे... ते वाचून सुद्धा मी एक ३० पानी लेख तयार केला आहे... पण इंग्रजीत असल्याने इथे टाकलेला नाही.. Happy

छान लिहिले आहे कुरूंदकरांनी. मस्त वाटले वाचायला.

असेच अजून काही विश्लेषण करणारे लेख असतील तर जरूर टाका (तुमचे स्वतःचेही). Happy

"शिवरायांचा आठवावा प्रताप" हे नरहर कुरूंदकर लिखित पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे.

मोगलांनी मंहमद कुलीखानला पण दक्षिणेत ठेवले नव्हते. तो आणि शिवाजी परत एकत्र आले तर जड जाईल म्हणून कुलीखानाचे रवानगी उत्तरेत अफगाण कडे झाली.

खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला ??? राजांनी की खानाने ??? >> ज्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय? हे कळले नाही ते असा प्रश्न नेहमीच विचारतात. ह्यांच्यात आणि इंग्रज होते तेच बरे होते असे म्हणणार्‍यांच्यात फारसा फरक नाही!

होय केदार... नेताजी उर्फ कुलीखान याला विशेष करून १६६६ नंतर अफगाण सीमेवरील मोहिमेस पाठवण्यास हेच कारण होते.

पण शेवटी औरंगेजेबाने १६७६ मध्ये त्याला दिलेरखानाबरोबर दक्षिणेस का पाठवावे? तो मराठ्यांना विसरला असेल असे औरंगजेबासारख्या माणसाने विसरणे शक्य वाटत नाही.

भटक्या, दिलेरखानाची कैद होती. सरदारकी मध्ये बरोबरी नव्हती. शिवाय इतके वर्षे गेल्यावर कुलीखान आता "खान" झाला असे औरंगाजेबास वाटणे साहजिक आहे कारण धर्म बदलणारे लोक जास्त कडवे होतात / होऊ शकतात. (अपवाद रेव्हरंड टिळक वगैरे प्रभृतींचा). पण कुलीखानाला पश्चाताप झाला म्हणून तो तिथून सुटून परत शिवाजीराजांना मिळाला.

नेताजी परत नेताजी मात्र होऊ शकला नाही. ती रग निघून गेली होती.

आणि एक गोष्ट चिपळूणास सैन्यात बेदिली निर्माण झाली होती. ती हंबीरराव मोहित्यांनी शमविली.मला हंबीरराव मोहिते सरनौबत म्हणून सर्वात जास्त आवडतात. मग ते अण्णाजी दत्तो प्रकरण असो की वरील चिपळूनचे सैन्यातील चहाच्या पेल्यातील वादळ, त्यांचे कार्य फार महान!

खरे आहे केदार... माणकोजी, नेताजी आणि प्रतापराव यांना राजांच्या कार्याचे मर्म पूर्णपणे उमगले नाही काय असे वाटते. ह्या तिघांनी अनेक पराक्रम गाजवले पण कुठेना कुठे चूक केलीच.. हंबीरराव माझे देखील सर्वात आवडते... ह्या सरनौबताने १२ वर्षे स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आणि राजांच्या मृत्यूनंतरही शंभूराजांना सहाय्य केले. खरा राजधर्म त्यांनी पळाला. ह्यावर 'शिवदें'चे एक पुस्तक आहे.. छोटेच आहे पण वाचनीय आहे... Happy

माझे मत!

नेताजी - बेसुमार शूर आणि निष्ठावान! क्षुल्लक गैरसमजांमुळे बेबनाव! भर चौकात सुन्नत झाल्याच्या अपमानाचे शल्य! अफगाणिस्तानातूनही पळून जाण्याचा प्रयत्न! मात्र परत आल्यानंतर महाराजांनी पुर्वीचे स्थान दिले नाही. तरीही हिंदू धर्मात घेण्यासाठी धार्मिक विधी करून घेतले. हे महाराजांचे महानपण!

(अवांतर - लाईट, मोबाईल फोन व वाहने अशी कोणतीही साधने नसताना आणि महाराजांना अफझलखानाने काही बरे वाईट केले की काय याची काहीही माहिती नसताना केवळ ठरले आहे म्हणून नेताजी जावळीच्या खोर्‍यात अभुतपुर्व कहर केला शौर्याचा! नेताजी नाव उच्चारले तरी मुघल पळायला लागले अशी अवस्था केवळ काहीशे मावळ्यांना सोबत घेऊन नेताजीने आणली. )

कुडतोजी - ते काव्य सगळ्यांना माहीत आहेच, पण यांना कर्तबगारीपेक्षा परिस्थिती म्हणून सरलष्कर बनवण्यात आले की काय असे वाटते.

हंबीरराव मोहिते - हा माणूस मात्र निष्ठेचा जागता पुरावाच म्हंटला पाहिजे. अण्णाजी आणि मोरोपंतांसारख्यांना अटक करून संभाजी राजांकडे आणायला रक्तातच निष्ठा लागणार! शौर्याच्या बाबतीत नेताजी नंतर दोन क्रमांकावर असावेत.

या सर्वावरून असे वाटते की नेताजी गेला नसता तर कदाचित वेगळे चित्रही असते. कारण नेताजीला उत्तर आणि दक्षिण सगळेच वचकून असावेत.

मात्र एक मला समजलेले नाही, कुणी सांगीतल्यास बरे होईल, की दिलेरखानाने केवळ औरंगजेबाने पाणउतारा केला म्हणून विष घेऊन आत्महत्य का केली असावी?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीर ... लाईट, मोबाईल फोन व वाहने अशी कोणतीही साधने नसताना आणि महाराजांना अफझलखानाने काही बरे वाईट केले की काय याची काहीही माहिती नसताना केवळ ठरले आहे म्हणून......
>>> ह्यालाच तर वेळेचे गणित म्हणतात.. Happy प्लान ठरलेला. काहीही झालेतरी पार पडायचाच. कित्ती बारीक सारीक गोष्टी ठरलेल्या असतील.

नेताजीला पूर्वीचे स्थान परत मिळाले नाही (ते शक्यच नव्हते) तरी संभाजी राजांनी त्याला अकबराबरोबर (औरंगजेबाचा पुत्र) राहायची जबाबदारी दिली होती. पण ह्याबद्दल निश्चित पुरावा नाही. नेताजी वारले कुठे हे देखील नक्की माहित नाही. असो... प्रतापराव हा त्यावेळी सर्वात लायक असा असल्याने त्याला सरनौबत पद मिळणे साहजिक होते. ह्याच प्रतापरावांनी संभाजी कावजीला मारले. हो हो.. तोच संभाजी कावजी ज्याने अफझलखान वाढत राजांना साथ दिली होती. पुढे तो मुघलांना सामील झाला.

दिलेरखानाने विष घेतले नाही तर त्याला दिले असावे.. Happy औरंगजेबाची ख्यातीच होती ती.. काम झाले की लोकांना संपवायची..

प. भ.,
त्या चित्राबद्दलचा माझा गैरसमज दूर केल्याबद्दल खरंच धन्यवाद!
पण मग मूळ चित्र कुठे उपलब्ध आहे का?

मी इतिहास केवळ आवड म्हणूनच वाचते, पण आता तुम्ही सांगितलेली पुस्तकं नक्की वाचेन. सध्या माझी उपासमार होतेय वाचनाची. असो.

Pages