चिन्नु यांचे रंगीबेरंगी पान

लकेर

Posted
28 April, 2017 - 13:29
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

कुठून लकेर येते, माझे जीवन गाणे होते!

लाटेचे पैंजण किणकिणती, झुळकेशी खिदळत मोहक गाती,
अल्हाद सूरांना दटावत एक, पान तिथे संन्यासी होते-
माझे जीवन गाणे होते!

मध्येच दिसते, लपून बसते, लाजून आढेवेढे घेते,
मनमोराला उगा खूळावत, अवखळ धून सवार होते-
माझे जीवन गाणे होते!

मी पहिली मी पहिली म्हणते, अल्लड श्रुती नादावत जाते,
भावसख्याचे गूज लेऊनी, खळखळते! रुणझूणते!
माझे जीवन गाणे होते!

- चिन्नु

प्रकार: 

गाणं..

Posted
23 February, 2016 - 06:56
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

हृदयाला घट्ट बिलगून आहे एक गाणं..

एका एका श्वासाने भरत जातो अंतरा,
थोडा चंद्र , थोडा सूर्य की चांदण्यांच्या मात्रा..

फुलपाखरी पंख घेऊन भुर्र फिरून येते,
मनातल्या चोराला मोकाट सोडून देते!

कुठंकुठं खण्ण वाजते अनुभूतीचे नाणं..
चढ्या लयीत गाऊन घेत्ये मिठीतलं गाणं!

खोल खोलश्या विहीरीतून आलेत सूरपक्षी
पाणी शिंपीत तुळशीपाशी तुझ्या रांगोळीची नक्षी..

एक सूर पारव्याचा, एक जीवनगाणं..
जुन्या गोधडीच्या मऊ पोतीचं आहे रेशीमगाणं...

प्रकार: 
शब्दखुणा: 

कलेवर

Posted
30 April, 2014 - 08:54
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

रोज घेऊन फिरावं
आपलंच कलेवर, आपल्याच खांद्यावर..
नियतीच्या विस्तिर्ण फांद्या, गळफास म्हणूनही येतात कामी कुणाच्या..
आपण मात्र तिरडी बांधावी-
त्या फांद्यांमध्ये कर्माचा दोर घालून आवळत रहावं..
रोज नव्या दमानं कलेवराला काजळ-तीट करत रहावं..
स्वतःची माती होईपर्यंत............?

- चिन्नु

प्रकार: 
शब्दखुणा: 

पाखरवेळा

Posted
29 October, 2013 - 20:39
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

चिंब फुलपाखरी लेवूनी रंग
पाकळी पाकळी होतसे गंध
सोनसकाळी किरणांची पल्लखी
डोलत फिरते झुळूकी मंद

एक डहाळी, पाखरांची शाळा
दवं-भिजल्या माळा पानोपानी
इंद्रधनु अल्लद चोचीत धरूनी
सूर हाळीतो कुणी या रानी

धरून कमानी-माडांच्या झाळी
विसावती मेघधन श्वेतश्यामला
आद्य अनंत ते- रूप चिरंतन
कण कण होई विठू सावळा
....कण कण होई विठू सावळा!

प्रकार: 
शब्दखुणा: 

मूठ

Posted
5 May, 2013 - 08:45
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

तुला काय?
तू पाठ फिरवून जाशीलही..
मग मी मला कसं आणि कुठंवर गोळा करू?
तुटल्या जीवाचे तार तार झाले..
भिनलेत सूर, कसे वजा करू?
सख्य नुरले वेड्या आसवांशी..
कसे आरश्याशी दगा करू?
खोल मूठ एकदाच ह्या जीवाची
कुठंवर श्वासांची निगा करू?
अस्तित्वाचा झगडा जिण्याशी
बोल मना तुला काय सजा करू?

प्रकार: 

गंमत गाणे

Posted
25 June, 2011 - 04:10
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

एक होते गंमत गाणे
इवल्या इवल्या शब्दांचे ते
तरल वेल्हाळ नाजुक तराणे
एक होते गंमत गाणे

शब्द सुटले, गंमत झाली
शब्द फुटले, गंमत झाली!
गीत-सुमांच्या शाखेवरती
विहरण्या शोधी किती बहाणे,
एक वेडे गंमत गाणे!

कसे निसटले अक्षर अक्षर?
कुणा गवसले अक्षर अक्षर?
स्वरासमुहा शब्दांत पकडण्या
नकोच म्हणती वाट पहाणे,
असले एक गंमत गाणे

अल्लद असंख्य भाव भाव
घेती मनाचा ठाव ठाव
गुपीत तयांचे शब्दास सांगत
गुंफतात आपुलेच गार्‍हाणे
असे एक वेडे गंमत गाणे!

'खूब लडी मर्दानी'च्या निमित्ताने..

Posted
26 April, 2010 - 05:13
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

खूब लडी मर्दानी.. मर्दानी?
हो, स्त्री असूनही स्त्रीत्वाच्या मर्यादा सांभाळून आपल्या हक्कासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी लढणारी मर्दानी!
एका स्त्रीला काय हवं? सहा महिने तरी कुटुंबाला पुरेल एवढे अन्न आणि सहा महिने तरी धकवता येइल एवढे सरपण..
मनुला-मणिकर्णिकेला कधी वाटलं असेल का, तिचा असा एक comfort zone असावा? राजबिंडा पती-संसार-मुलं..बस्स्-हेच जीवन असावं? ती स्त्रीच होती, तिच्याही मनाशी ह्या भावना असतीलच. पण, या जगात-'किसीको मुक्कमिल जहाँ नही मिलता'..

विषय: 
प्रकार: 

नि:शब्द

Posted
31 March, 2010 - 06:17
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

अंधाराला सरावली नजर
खिडकीतले तारे मोजत्येय..
नेमके किती?
ह्या मनाने काहीही उत्तर दिलं तरी
ते मन खोडू शकणार नाही याची खात्री!

दिवा लावायची भिती वाटत्येय..
प्रकाशात कदाचित आरश्यानेही ओळख दिली नाही तर?
सख्या झालेल्या या भिंती, घाबरून मागे सरल्या तर?

खिडकीवर झुकलेले माड..
त्यांच्या नजरेतलं कुतूहल कधीच ओसरलयं..
आताश्या ते फक्त आधार देतात-
आठवणींची मोळी वाहत; उन्हं उतरत कुठेतरी जाणार्‍या दिवसाला आणि
ओळखदेख असून नसल्यासारखे दाखवत, नि:शब्दपणे वावरणार्‍या रात्रीला...

विषय: 
प्रकार: 

खिचडी

Posted
26 March, 2010 - 08:04
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मी त्या दिवशी खूप आनंदात होत्ये. प्रमोशन झालं होतं, त्यामुळे आमचं विमान एकदम हवेत तरंगत होतं. शनिवार आला आणि मी आईबाबां मागे भुणभूण लावली माझ्याबरोबर लंचला यायला. पपांना काम होतं मग आई फक्त शॉपिंगला तयार झाली, लवकर येऊ- या अटीवर. हेही नसे थोडके! थेट सिकिंदराबाद गाठले. हा ड्रेस, तो ड्रेस मग हिच्यासाठी, तो शर्ट दादासाठी करत 'पार्कलेन' आणि किरकोळ खरेदीसाठी 'जनरल बजार' पालथं घालून झालं. एव्हाना खूप उशीर झाला म्हणून आईला बळेबळे 'उत्सव'ला नेलं. ते कसं छान शाकाहारी आहे, मग फेस्टिवल्स चालु असतात, बेबी कॉर्न मसाला इथे छान मिळतो वगेरे वगेरे माझी टकळी चालुच होती.

विषय: 
प्रकार: 

गोड गाणे! (तिळगुळ घ्या गोड गोड बोला)

Posted
14 January, 2010 - 06:33
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

तुझे गोड गाणे

मना वेड लावी तुझे गोड गाणे
खळाळून वाही तुझे गोड गाणे

कितीदा क्षणांन्ना विस्मरून जावे
मन्तरून जाई तुझे गोड गाणे

कुणा पारव्याची घुमे शीळ रानी
तरंगे मनाशी तुझे गोड गाणे

कुठे शांत माझे अबोले उसासे
गन्धाळून देही तुझे गोड गाणे

उदासीन होते किनारे दिलाचे
कशी ओढ लावी तुझे गोड गाणे

कळीबंद स्वप्ने, धुके आर्जवी ती
जशी गोड चोरी - तुझे गोड गाणे!!

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - चिन्नु यांचे रंगीबेरंगी पान